तरुणीसोबत हॉटेलमध्ये जाण्याच्या घटनेमुळे वादात सापडलेले मेजर लितूल गोगोई यांच्याविरोधात लष्कराने शुक्रवारी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीतून काय समोर येते त्यावर पुढची कारवाई अवलंबून असेल असे लष्कराकडून सांगण्यात आले आहे. मेजर लितुल गोगोई यांनी श्रीनगरमधील हॉटेल ग्रँड ममतामध्ये एक रुम बुक केली होती. बुधवारी गोगोई हे हॉटेलमध्ये चेक- इन करत असताना त्यांचासोबत एक तरुणी होती.

हॉटेल कर्मचाऱ्यांना ती तरुणी अल्पवयीन असल्याचा संशय आला. ओळखपत्र तपासले असता ती बडगामची रहिवासी असल्याचे समोर आले. हॉटेलमध्ये स्थानिक तरुणींना प्रवेश दिला जाणार नाही, असे हॉटेल कर्मचाऱ्यांनी गोगोई यांना सांगितले. यावरुन गोगोई आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. गोगोईंसोबत आणखी एक तरुणही होता. शेवटी हा वाद चिघळला आणि प्रकरण पोलिसांकडे गेले. पोलिसांनी गोगोई, ती तरुणी आणि एका तरुणाला पोलीस ठाण्यात नेले.

चौकशीनंतर त्या तिघांचीही सुटका करण्यात आली. ती तरुणी सज्ञान असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोगोई ज्या तरुणीसोबत हॉटेलमध्ये गेलेले त्या तरुणीच्या आईने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत गोगोईंवर गंभीर आरोप केले. गोगोई यांनी यापूर्वीही दोन वेळा रात्री उशिरा आमच्या घरात आले होते. या छाप्याबाबत बाहेर भाष्य करु नका, असे गोगोईंनी आम्हाला सांगितले होते, असे मुलीच्या आईने म्हटले आहे.

गोगोई प्रकरणावर लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी प्रतिक्रिया दिली. जर भारतीय सैन्यात कोणीही गैरकृत्य केले असेल तर त्याच्यावर कारवाई होणारच. जर मेजर गोगोई यांनी काही गैरकृत्य केले असेल तर त्यांना कठोर शिक्षा होईलच आणि ही शिक्षा इतकी कठोर असेल की यातून दुसऱ्यांवरही वचक निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.