काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची माहिती गोळा करणाऱ्या सुरक्षा यंत्रणेच्या कारवाईला ‘राजकीय हेरगिरी’ संबोधणाऱ्या काँग्रेस नेत्यांना सत्ताधारी भाजप नेत्यांनी सोमवारी संसदेत प्रत्युत्तर दिले. काँग्रेसकडे कोणतेही मुद्दे शिल्लक नसल्याने ते उगाचच बिनमहत्त्वाच्या विषयांवर सभागृहाचा वेळ वाया घालवत असल्याचा पलटवार संसदीय कामकाज मंत्री वेंकय्या नायडू यांनी केला. हेरगिरी कुणाच्या घरी जाऊन होत नाही; असे प्रत्युत्तर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले. काँग्रेसचे आरोप बिनबुडाचे असून हा प्रकार डोंगर पोखरून उंदीरही बाहेर आला नाही, असा आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत राहुल गांधींविरोधात राजकीय हेरगिरी होत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.
देशाच्या माजी पंतप्रधानांची हत्या झाल्यावर (राजीव गांधी) त्यांचे शव ओळखण्यासाठी त्यांनी परिधान केलेला बूट कामी आली. त्यामुळे एखाद्या अतिमहत्त्वाच्या नेत्याची माहिती गोळा करताना अशा बाबींचा तपशील नोंदवण्यात येतो. ही एक नियमित प्रक्रिया आहे. शिवाय आपण कुणीही सुरक्षातज्ज्ञ नसल्याने उगाचच या मुद्दय़ावर चर्चा करणे व्यर्थ असल्याचे सांगून जेटली यांनी काँग्रेसच्या विरोधातील हवाच काढून टाकली. त्यामुळे राहुल गांधी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा रंग, उंची, वजन आदी तपशील गोळा करणाच्या पोलिसांच्या नियमित कामाला ‘राजकीय हेरगिरी’ ठरवून भाजपला कोंडीत पकडण्याचा काँग्रेसचा डाव सभागृहात फसला.
बऱ्याचदा नेत्यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तींची माहिती विचारण्यात येते. त्यामागे केवळ संबंधित नेत्याची सुरक्षितता हाच उद्देश असतो. पोलीस अर्जाच्या नमुन्यात १९९९ मध्ये बदल झाला. हा अर्ज भरण्यासाठी खासगी माहिती विचारली जाते. नायडू यांच्या वक्तव्यावर वारंवार आक्षेप घेत काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पोलीस अधिकारी दोनदा राहुल गांधी यांच्या कार्यालयात चौकशीसाठी का गेले, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.
राज्यसभेत सत्ताधाऱ्यांपेक्षा संख्येने जास्त असणाऱ्या काँग्रेस नेते भाजपविरोधात आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्यापासून राहुल गांधी यांना एसपीजी सुरक्षा आहे. आताच राहुल गांधी यांचा रंग, बुटाचा साइज, कपडय़ांची आवड आदी मुद्दय़ांचा तपशील जमा करण्याची काय गरज सरकारला भासली? काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी आझाद यांच्या सुरात सूर मिसळला.
सरकार न्यायाधीश, वरिष्ठ अधिकरी, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर नजर ठेवून आहे. त्यामुळे या प्रकाराची सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शर्मा यांनी केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांत जेटली यांनी निवेदन
दिले.

१९५७ पासूनची प्रक्रिया
वेंकय्या नायडू यांनी, अशी माहिती गोळा करण्याची प्रक्रिया आतापासून नव्हे तर १९५७ पासून सुरू असल्याचे सांगून विस्तृत तपशीलच सभागृहात सादर केला. आतापर्यंत तब्बल ५२६ अतिमहत्त्वाच्या नेत्यांचा असाच तपशील गोळा करण्यात आला आहे.  पोलिसांकडे असलेला अर्जच नायडू यांनी वाचून दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांची माहिती पोलिसांकडे आहे. यामुळे सुरक्षा देणे सोपे होते.