राजीव गांधी यांनी या देशासाठी आपले आयुष्य वेचले, त्यांनी आपले प्राणही पणाला लावले. त्यांच्या योगदानाबाबत आत्तापर्यंत भाजपानेही कधीही संशय घेतला नाही. असे असतानाही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने राजीव गांधी यांचा भारतरत्न हा पुरस्कार परत घेण्यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर केला. याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी केली. तसेच तो प्रस्ताव रद्द केला गेला पाहिजे असेही अजय माकन यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना देण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार काढून घ्यावा अशा संदर्भातला प्रस्ताव आपने दिल्ली विधानसभेत शुक्रवारी मंजूर केला. यानंतर काँग्रेसने आपवर टीकेची झोड उठवली आहे. आप हा पक्ष म्हणजे भाजपाची बी टीम आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे. तर राजीव गांधी यांचे योगदान ठाऊक नसताना आपने अशी मागणी करणं म्हणजे त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे असेही काँग्रेसने म्हटले आहे. आता तर अरविंद केजरीवाल यांनी याप्रकरणी माफी मागण्याचीही मागणी जोर धरू लागली आहे.

१९८४ मध्ये उसळलेल्या शीख दंगलीत राजीव गांधी दोषी होते असा आरोप आप सरकारने केला आहे. याच आरोपामुळे आपने राजीव गांधी यांचा भारतरत्न पुरस्कार परत घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र या प्रकरणावरून काँग्रेसने आपवर ताशेरे झाडले आहेत. आता हे प्रकरण कोणतं वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.