ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम)चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. मोदी यांच्यावर टीका करताना भाजपा अद्यापही गुलामीच्या काळातून बाहेर आलेला नाही, ते अजूनही गुलामीतच जगत आहेत अशी टीका त्यांनी केली. भाजपाची विचारधारा स्वतंत्र नसून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वैचारिक गुलामगिरीत असल्याचे अप्रत्यक्ष प्रतिपादन ओवेसी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणाचा उल्लेख करताना, “मोदी ही एकमेव अशी व्यक्ती आहे ज्यांच्याकडे राज्यशास्त्राची पदवी आहे” अशी भलामण करतानाच त्यांनी मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवरून झालेल्या वादाची आठवण करून देत पंतप्रधानांच्या शिक्षणावरुन उपरोधिक टीका केली. तर राहुल गांधींना लक्ष्य करताना राहुल गांधींकडे वेगळं काय आहे, हे अद्यापही मला समजलेलं नाही अशी खोचक टीका ओवेसींनी केली. तसंच, सध्याच्या घडीला राहुल गांधी हेच भाजपासाठी मोठी ताकद बनले आहेत असं ओवेसी म्हणाले. विरोधकांकडे सक्षम नेता नसून राहूल गांधींचा प्रचार भाजपाच्याच पथ्यावर पडतो असं त्यांनी सुचवलं आहे.

एका वृत्तवाहिनीच्या मुंबई मंथन या चर्चासत्रात भाजपाचे नेते शहानवाझ हुसेन व एमआयएमचे असदुद्दिन ओवेसी यांच्यात चर्चा सुरू असताना ओवेसी यांनी मोदी आणि राहुल गांधींवर टीका केली. यावेळी बोलताना, ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही हल्लाबोल केला. राम मंदिराच्या निर्माणासाठी संघ का दबाव टाकतं असा सवाल त्यांनी केला. पण दुसरीकडे मोदी सरकार राम मंदिराबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करायला तयार नाहीये असं ओवेसी म्हणाले. भारतामध्ये आरएसएस व भाजपा चुकीचा इतिहास पसरवत असल्याचे सांगत गोळवलकर गुरूजी व सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यांचे दाखले देत ते मुस्लिमविरोधी असल्याचे सांगितले. सबरीमाला मंदिराबाबत भाजपाने भूमिका स्पष्ट का केली नाही, सीबीआयसारख्या देशाच्या सर्वोच्च तपास यंत्रणेत वाद सुरू असताना त्यावरही मोदी काही बोलत नाहीत, असं काय घडलं की सीबीआयचे दोन अधिकारी आपापसांत भिडले असा सवालही ओवेसींनी विचारला.