इसिस या दहशतवादी संघटनेशी दोन हात करण्यासाठी अमेरिका ब्रिटन, फ्रान्स, रशिया, जर्मन या देशांचे सैन्य सिरियात उतरले आहे. या फौजा इसिसला नामाशेष करण्यासाठी जीवाचे रान करत आहेत पण या सगळ्यात संपूर्ण जगाचे लक्ष आपल्या वेधून घेतले ते एका सुंदर तरूणीने. गोरा पान रंग, सडसडीत बांधा, उंच, लांब पिंगट केस आणि घारे डोळे. तिला पाहिले तर चित्रपटातली एखादी अभिनेत्री शोभली असती ती. पण ही मुलगी अभिनेत्री नव्हती, ना मॉडेल. हातात बंदुक घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत ती इसिस या दहशतवादी संघटनेशी लढली. पण आता तिने मात्र अखेरचा श्वास घेतला आहे. आशिया रमाझान अंतर असे या मुलीचे नाव. तिचे वय फक्त १९-२० वर्षांच्या आसपास.
ज्या वयात तरूण मुल मजा मस्ती करतात. आपली कॉलेज लाईफ एन्जॉय करतात त्या काळात आशिया खांद्यावर बंदुक घेऊन या जुलमी दहशतवाद्यांच्या सामान करत होती. गेल्याच आठवड्यात इसिसच्या आत्मघाती दहशतवाद्यांना थांबवताना तिचा मृत्यू झाला. पण  तिच्या मृत्यूबद्दलची  अधिकृत घोषणा झाली नव्हती. त्यामुळे संपूर्ण जगाने ती जिंवत राहवी यासाठी प्रार्थना केली होती. पण मृत्यूपुढे कोणाचे चालत नाही म्हणतात तसे अशियाने अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण जग हळहळले. सिरिअन कुर्दीश वुमन प्रोटेक्शन युनिट या लढवय्या संघटनेतर्फे ती इसिसची लढत होती. या संघटनेचा ती चेहरा होती. तीन आत्मघातकी हल्लेखोर गाड्या घेऊन हल्ला करण्यासाठी निघाले होते. या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी ती आणि तिचे काही साथी पुढे सरसावले. यातल्या दोन दहशतवाद्यांना मारण्यात त्यांना यश आले. पण तिसरा दहशतवादी त्यांच्या अधिक जवळ आला आणि त्याने स्वत:ला स्फोटकानी उडवून दिले. यात तिचा आणि तिच्या इतर सहका-यांचा मृत्यू झाला. आशिया ही सुंदर असल्याने तिला कुर्दीशांची अँजेलिना जोली म्हणून ओळखले जायचे. इसिसविरुद्ध लढणा-या या सुंदर तरूणीचा चेहरा अनेक महिलांचा प्रेरणास्थान बनला होता. ती कुर्दीश स्त्रीवादी म्हणून देखील ओळखली जायची. इसिसच्या अत्याचारातून इथल्या स्थानिक महिलांना मुक्त करायचे हाच हेतू घेऊन तिने २०१४ मध्ये इसिसविरुद्ध रणशिंग फुंकले होते.