नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने नव्याने चलनात आणलेल्या ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांमध्ये ‘घोळ’ असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मध्य प्रदेशातील दामोह येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) एटीएममधून एका ग्राहकाने काढलेल्या ५०० रुपयांच्या नोटांवर सिरियल नंबरच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या आठवड्यातही अशाच दोन घटना दामोहमध्ये उघडकीस आल्या होत्या. या प्रकरणी संबंधित व्यक्तींनी पोलिसांत तक्रार केली आहे.

दामोह येथील हॉस्पीटल चौकातील एसबीआयच्या एटीएममध्ये सोमवारी नारायण प्रसाद अहिरवाल पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी एटीएममधून एक हजार रुपये काढले. त्यांना ५०० च्या दोन नोटा मिळाल्या. मात्र, त्या नोटांवर सिरियल नंबरच नव्हते. त्यांच्यानंतर इतरांनीही या एटीएममधून पैसे काढले. त्यांना मिळालेल्या ५०० च्या नोटांवरही सिरियल नंबर नव्हते. ही बाब सबंधितांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी एटीएम बंद केले. एटीएममध्ये या बोगस नोटा कुठून आल्या याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे, असे एसबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारने बोगस नोटांचा काळा धंदा बंद करण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. पण त्यानंतरही बोगस नोटांचा हा उद्योग सुरूच असल्याच्या अनेक घटना समोर येत असल्याने बोगस नोटांच्या कारभाराला आळा बसला नसल्याचे बोलले जाते. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील संगम विहार परिसरातील एका एटीएममधून ग्राहकाला २००० हजार रुपयांची नवी कोरी नोट मिळाली; पण ती ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ची खरीखुरी नोट नसून ‘चिल्ड्रेन बँक ऑफ इंडिया’ची खेळण्यातील बोगस नोट असल्याचे समोर आले होते. दक्षिण दिल्लीतील एका खासगी कंपनीत कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत असलेला रोहित कुमार संगम विहार परिसरातील एटीएममध्ये गेला होता. त्याने आठ हजार रुपये एटीएममधून काढले. मात्र, एटीएममधून निघालेल्या दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा या बोगस असल्याचे त्याच्या लक्षात आले. या नोटांवर ‘चिल्ड्रेन गव्हर्नमेंट’तर्फे जारी करण्यात येत असल्याचा उल्लेख करण्यात आला होता.