पाटणा : नवी दिल्लीला जाणाऱ्या एका रेल्वेगाडीत अंतर्वस्त्रांवर वावरल्यामुळे आणि सहप्रवाशांनी त्यावर हरकत घेतल्यानंतर त्यांच्याशी भांडल्यामुळे चर्चेच्या झोतात आलेल्या बिहारमधील सत्ताधारी जनता दल (संयुक्त)च्या एका आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार गोपाल मंडल यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली, तसेच एससी- एसटी कायद्याखाली आरा येथील शासकीय रेल्वे पोलीस ठाण्यात शनिवारी एफआयआर नोंदवण्यात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

तेजस एक्सप्रेस शुक्रवारी दिल्लीला पोहचल्यानंतर, तक्रारकर्ता प्रल्हाद पासवान यांनी नवी दिल्लीच्या जीआरपी ठाण्यात त्यांचे बयाण नोंदवले.

आमदार तेजस एक्सप्रेसच्या ज्या डब्यात होते, त्यातूनच आपणही प्रवास करत होतो. मंडल हे बनियान व अंतर्वस्त्रावर शौचालयाकडे जात असल्याचे पाहून आपण नाराजी व्यक्त केली, तेव्हा त्यांनी आपल्याला मारहाण केली. त्यांच्या साथीदारांनी आपल्याला नाव विचारले व ते सांगितल्यामुळे जातिवाचक शिवीगाळही केली, असा आरोप पासवान यांनी केला.

या लोकांनी आपल्याजवळील अंगठीसह काही किमती वस्तू लुटल्या, तसेच शौचालयाच्या नळाचे पाणी प्यायला लावले, असेही पासवान यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलेआहे.

भागलपूर जिल्ह्य़ातील गोपालपूर मतदारसंघाचे आमदार असलेले मंडल यांनी त्यांच्यावरील आरोपांवर प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी आपल्याला हगवण लागली होती आणि गुरुवारी सायंकाळी गाडी पाटण्याहून सुटली, तेव्हाच आपल्याला शौचालयाला जाण्याची भावना झाली, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे