जगप्रसिद्ध डीजे एविची याचा मृत्यू दोन्ही हाताच्या नसा कापल्याने आणि मानेवर कापून घेतल्यानंतर झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे झाल्याचे समोर आले आहे. हा कोणताही घातपाताचा प्रकार नसून एविचीने त्याचे आयुष्य संपवल्याची माहितीही समोर आली आहे. ‘डेलि मिरर’ ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. एविची अवघा २८ वर्षांचा होता, त्याला काही प्रमाणात नैराश्य आले होते.

मी आता अखेरच्या प्रवासाला जाणार आहे असे त्याने ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध केलेल्या डॉक्युमेंट्रीतही म्हटले होते असेही त्याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. त्याच्या कुटुंबीयांनी एक खुले पत्र समोर आणले आहे ज्यात त्यांनी हा दावा केला आहे की डीजे एविचीने आत्महत्या केली. एविचीने नैराश्य आल्यामुळे वाईन बॉटलच्या काचांनी आपल्या हाताच्या आणि गळ्याच्या नसा कापून घेतल्या. यातून प्रचंड रक्तस्त्राव झाला. या अतिरक्तस्त्रावामुळेच त्याचा मृत्यू झाला असेही त्याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

सुप्रिसद्ध स्वीडिश डीजे एविची याचे ओमानची राजधानी असलेल्या मस्कतमध्ये निधन झाल्याची बातमी २१ एप्रिलला जगासमोर आली. आता त्यानंतर दहा दिवसांनी त्याने आत्महत्या केल्याचे वास्तव समोर आले आहे. एविची शांततेच्या शोधात होता, त्याला मानसिक शांतता हवी होती त्यासंदर्भात त्याने एका डॉक्युमेंट्रीत उल्लेखही केला होता. मानसिक शांतता न मिळाल्याने एविचीने आत्महत्या केली असावी असे त्याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

डीजे आणि रेकॉर्ड प्रोड्यूसर असलेल्या एविचीला लोक त्याच्या इलेक्ट्रॉनिक म्युझिकसाठी ओळखतात. एविचीचे मूळ नाव टिम बर्जलिंग होते. जगातल्या वेगवेगळया देशांमध्ये एविचीने कार्यक्रम केले होते. त्यामुळे जगभरात त्याचा चाहता वर्ग आहे. एविचीला दोन एमटीव्ही पुरस्कार, एक बिलबोर्ड म्युझिक अॅवॉर्ड मिळाला आहे. ‘वेक मी अप’, ‘द डेज’ आणि ‘यू मेक मी’ ही एविचीची गाणी बरीच गाजली.

एविचीचे ‘वेक मी अप’ हे गाणे २०१३ साली ऑस्ट्रेलियामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले. २०१३ साली आलेल्या True या डेब्यु अल्बमपासूनच एविचीने स्वत:हाची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याचा एक चाहतावर्ग तयार झाला होता. निधनाच्या काही दिवस आधीच एविचीला टॉप डान्स आणि इलेक्ट्रॉनिक अल्बमसाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या बिलबोर्ड म्युझिक पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.