राम मंदिराचा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोर धरत असताना सुप्रीम कोर्टात बाबरी मशीद राम जन्मभूमी जमीन वादावर पाच सदस्यीय न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. १० जानेवारीपासून सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात होणार आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने अयोध्येतील २.७७ एकर जागा सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा व राम लल्ला यांना सारख्या प्रमाणात वाटून देण्याचा निकाल २०१० मध्ये दिला होता. त्यावर १४ अपिले प्रलंबित आहेत. एकूण चार दिवाणी दाव्यांवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने जमीन सारखी वाटण्याचा निकाल दिला होता. गेल्या २९ ऑक्टोबरला न्यायालयाने रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीन वादावर योग्य पीठामार्फत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी केली जाईल असे जाहीर केले होते. या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्याची मागणी करणारा अर्ज हिंदू महासभेने केला होता.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी या प्रकरणावर फक्त ३० सेकंद सुनावणी झाली. १० जानेवारीपासून या प्रकरणावर सुनावणी सुरु होईल, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. मंगळवारी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची पाच सदस्यीय  न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी होईल, असे स्पष्ट केले.  सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठात न्या. एस ए बोबडे, न्या. एन. व्ही. रमण, न्या. यू यू ललित आणि न्या. डी वाय चंद्रचूड यांचा समावेश आहे.