एका छोट्या मुलीचे रूग्णालयातून अपहरण झाले, प्रयत्नांची शर्थ करत या मुलीला पोलिसांनी सोडवले. या मुलीला सोडवण्यात ज्या महिला अधिकाऱ्याने पुढाकार घेतला होता त्याच महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव या मुलीला ठेवण्यात आले आहे. हैदराबाद येथील सरकारी रूग्णालयात ही घटना घडली आहे. लहान मुलीला शोधून काढणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा असाही सन्मान करण्यात आला आहे. एम चेतना असे या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तिने अपहरणकर्यांच्या तावडीतून लहान मुलीला सोडवले. आता त्या लहान मुलीलाही चेतना हेच नाव ठेवण्यात आले आहे.

माझी मुलगी २७ जूनला नाही तर ३ जुलैलाच जन्माला आली असे मला वाटते आहे. एम चेतना यांनी माझ्या मुलीला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांमध्ये त्या यशस्वीही झाल्या असे या मुलीच्या आईने म्हटले आहे. सबावत नरी असे या मुलीच्या आईचे नाव आहे तिने ही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मुलीचे रूग्णालयातून अपहरण झाले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला असे वाटलेच नव्हते तिचा शोध लागेल. मात्र एम. चेतना यांनी प्रयत्नांची शर्थ करत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून माझ्या मुलीला सोडवले. २७ जूनला तिचा जन्म झाला त्यानंतर तिचे अपहरण झाले. तिला सोडवेपर्यंत आणि मला ती पुन्हा भेटेपर्यंत माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले होते. हा इतका भयंकर अनुभव मी कधीही विसरू शकत नाही असे नरी यांनी म्हटले आहे. द न्यूज मिनिटने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

माझ्या मुलीचे अपहरण झाल्याचे रूग्णालयातल्या लोकांना समजले तेव्हा ती परत मिळावी यासाठी अनेकांनी प्रार्थना केली. मला अनेकजण येऊन धीर देत होते. मी मात्र खूप अस्वस्थ झाले होते. सैरभैर झाले होते, काय करावे ते मला सुचत नव्हते. आता माझी मुलगी सुरक्षित आहे ती पोलिसांमुळेच. एसीपी एम चेतना यांनी माझ्या मुलीला शोधण्यासाठी जीवाचे रान केले, असेही या मुलीच्या आईने सांगितले आहे. दरम्यान या मुलीला एम चेतना यांनी सोडवून आणल्याने एम चेतना यांच्याच नावाप्रमाणे या मुलीचे नाव चेतना असे ठेवण्यात आले आहे. बिदर या ठिकाणी अपहर्णकर्ते या मुलीला घेऊन बसमध्ये चढत होते. त्याचवेळी पोलिसांना संशय आला त्यांनी या अपहरण कर्त्यांना अटक केली आणि या मुलीला त्यांच्या ताब्यातून सोडवले. आता या मुलीला नीलोफर रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.