ओसामा बिन लादेन या दहशतवाद्याचा खात्मा करणार ही माहिती जाणीवपूर्वक पाकिस्तानला दिली नव्हती असं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडन हे तेव्हा उपाध्यक्षपदी होते. त्यावेळी त्यांनी आणि माजी संरक्षण मंत्री रॉबर्ट गेट्स यांनी या मोहिमेला विरोध दर्शवला होता. असं असलं तरीही पाकिस्तानला या मोहिमेत सहभागी करुन घेण्यास मी विरोध दर्शवला होता असं बराक ओबामा यांनी म्हटलं आहे.  २ मे २०११ रोजी अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन या कुख्यात अतिरेक्याचा अमेरिकेने पाकिस्तानात शिरुन खात्मा केला होता. लादेनला पाकिस्तानात शिरुन कसं ठार केलं याबाबत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकात सांगितलं आहे.

पाकिस्तानी सैन्याचे आणि त्यांच्या गुप्तचर यंत्रणेचं अल-कायदा आणि तालिबान या दहशतवादी संघटनांसोबत संबंध होते ही बाब लपून राहिलेली नाही. ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानच्या एबोटाबादमध्ये लपून बसला होता. त्याचा खात्मा करण्याची जी मोहीम आखली गेली त्याची कल्पना पाकिस्तानला देण्यास मी नकार दिला होता. कारण पाकिस्तानी सैन्याचे दहशतवादी संघटनांशी संबंध होते. पाकिस्तान अतिरेक्यांचा वापर अफगाणिस्तान आणि भारत विरोधी कारवाईसाठी करायचा असंही ओबामांनी पुस्तकात म्हटलं आहे.

“आम्ही लादेनचा खात्मा करण्यासाठी गुप्त मोहीम आखली होती. पण या मोहिमेला माजी संरक्षण मंत्री रॉबर्ट गेट्स आणि माजी उपाध्यक्ष जो बायडन यांनी विरोध दर्शवला होता. आमच्या गुप्त मोहिमेची माहिती कुणालाही कळली असती तर एक मोठी संधी आमच्या हातून निसटली असती. त्यामुळे सरकारमधील फक्त मोजक्या मंत्र्यांनाच याबाबत माहिती देण्यात आली होती.” असंही ओबामा यांनी पुस्तकात म्हटलं आहे.

“पाकिस्तानच्या एबोटाबादमध्ये लष्करी छावणीजवळ लादेन लपून बसला होता. पाकिस्तानी सैन्याचं अतिरेक्यांशी असलेलं कनेक्शन लक्षात घेता या मोहिमेबाबत प्रचंड गोपनियता पाळली जाणं हे मोठं आव्हान होतं. त्यामुळे लादेनला नेमकं कसं ठार करायचं यासाठी अनेक पर्यायांचा विचार करण्यात आला. मात्र आम्ही कोणताही पर्याय अवलंबला असता तरीही पाकिस्तानला मोहिमेत सामील करुन घेतलाच नसतं. ” असंही ओबामा यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.