एका कुटुंबानं मेथीची भाजी समजून गांजा खाल्ल्याची घटना उत्तर प्रदेशातील कन्नोज जिल्ह्यात घडली. गांजा खाल्ल्यामुळे संपूर्ण कुटुंबच बेशुद्ध पडले. हे वृत्त सगळीकडे प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या घटनेवरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चिमटा काढला आहे.

भाजी विक्रेत्याने एका व्यक्तीला मेथीची भाजी समजून गांजा दिला. त्यानंतर कुटुंबीयांनी मेथीची भाजी समजून गांजा खाल्ला. त्यामुळे घरातील निम्म्यापेक्षा जास्त लोक बेशुद्ध झाले होते. ही घटना सध्या चर्चेत आली आहे. सोशल मीडियातूनही ही बातमी फिरत आहे. या घटनेवरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यान यांचं नाव न घेता टोला लगावला आहे.

“अखिलेश यादव यांनी बातमीचं कात्रण ट्विट केलं आहेत. त्याचबरोबर त्यांचं मतही व्यक्त केलं आहे. “आजकाल गांजा चांगलाच चर्चेत आहे. असं होऊ नये की अचानक आदेश यावा ‘आजपासून गांजाचं नाव मेथी’ भाजी बघून खरेदी करा,” असं ट्विट अखिलेश यादव यांनी केलं आहे.

योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक नाव बदलली होती. मुगलसराय रेल्वे स्टेशनचं नाव बदलून पंडित दीन दयाल उपाध्याय असं केलं होतं. त्यानंतर अलहाबाद जंक्शनचं नामांतर प्रयागराज केलं होतं. त्यावरून आदित्यनाथ यांच्यावर बरीच टीकाही झाली होती. नामांतराच्या या प्रकरणावरूनच अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांना नामोल्लेख न करता ट्विट करून चिमटा काढला आहे.