तिसऱ्या उमेदवाराबाबत भाजपचा खल

नवी दिल्ली : राज्यसभेसाठी भाजपचा तिसरा उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले हे भाजपचे पहिले उमेदवार असून सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभूत झालेले उदयनराजे भोसले यांचेही नाव निश्चित झाले आहे.

उमेदवाराला जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ३७ मतांची गरज आहे. भाजपकडे १०५ संख्याबळ असून अपक्षांच्या पाठिंब्यावर पक्षाला तीन सदस्य राज्यसभेवर पाठवता येतील. राज्यसभेतील राज्याचे सात सदस्य एप्रिल महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यामध्ये रामदास आठवले, संजय काकडे आणि अमर साबळे यांचा समावेश आहे. त्यापैकी रामदास आठवले यांना पुन्हा उमेदवारी देण्यात येईल. उमेदवारी निश्चित केल्याबद्दल गेल्या बुधवारी आठवले यांनी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेटही घेतली होती. उदयनराजे यांच्या उमेदवारीसाठी गेल्या महिन्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी दोन तास चर्चा केली होती. या बैठकीला उदयनराजेदेखील उपस्थित होते.

तिसऱ्या उमेदवारासाठी भाजपकडून चाचपणी सुरू होती. गेल्या बुधवारी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत येऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे पुनर्वसन केले पाहिजे असे भाजपच्या प्रदेश नेत्यांचे म्हणणे आहे. भाजपच्या खासदारांनीही हीच भावना बोलून दाखवली होती. भाजपचे प्रदेश नेते शनिवारी दिल्लीला आले होते. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांची भाजपच्या अशोक रोडवरील कार्यालयात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांशी चर्चा झाल्याचे समजते. प्रदेशनेते अमित शहा तसेच जे. पी. नड्डा यांच्याशी खडसे यांच्या उमेदवारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीत आल्याचेही सांगितले जाते. फडणवीस यांच्या नावाचीही चर्चा होती, मात्र आपल्याला दिल्लीत येण्यात रस नसल्याचे फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे भाजपश्रेष्ठी खडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब करतील असे मानले जात आहे.

राज्यसभेतील विद्यमान खासदार राष्ट्रवादीचे शरद पवार, माजीद मेमन, शिवसेनेचे राजकुमार धूत, काँग्रेसचे हुसेन दलवाई हे सदस्यही निवृत्त होत आहेत. रिक्त जागांसाठी २६ मार्च रोजी मतदान होईल. १३ मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. १६ मार्च रोजी छाननी होईल. १८ मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. निवडणूक बिनविरोध झाली तर १८ मार्च रोजी निकाल स्पष्ट होईल.