राजकारणात प्रवेश केल्याची घोषणा केल्यापासून प्रियंका गांधी यांच्यावर भाजपाकडून मोठ्याप्रमाणात शाब्दिक हल्ले होताना दिसत आहे. यामध्ये आता उत्तर प्रदेशमधील बलिया मतदारसंघाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी प्रियंका गांधींना शूर्पणखा म्हटले आहे तर राहुल गांधींची रावणाशी तुलना केली.

प्रियंका गांधींच्या राजकारणातील प्रवेशाबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सुरेंद्र सिंह म्हणाले की, जेव्हा राम आणि रावण यांचे युद्ध होणार होते. त्यावेळी रावणाने आधी आपल्या बहिणीला पाठवले होते. आता रामाच्या भूमिकेत मोदी आणि रावणाच्या रूपात राहुल आहेत. त्यांनी शूर्पणखाच्या रूपात आपली बहीण प्रियंका यांना मैदानात उतरवले आहे. आता आम्ही लंकेवर विजय मिळवला असे समजा.

काँग्रेस पक्ष ही तुटलेली नाव आहे. फक्त एससी/एसटी अॅक्टमुळे राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांना विजय मिळाला आहे. आता त्यांना कुठेही चंदन लागणार नाही, असा टोलाही लगावला.

प्रियंका गांधी यांना काँग्रेसचे सरचिटणीसपद दिल्यानंतर त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून काँग्रेसचा हा मास्टरस्ट्रोक असल्याचे बोलले जाते. परंतु, भाजपा सातत्याने प्रियंका गांधींवर टीका करत आहे. प्रियंका या सुंदर आहेत. पण सुंदर चेहऱ्यांना मते मिळत नाहीत. त्यांना राजकारण येत नाही, अशी टीका बिहारचे मंत्री आणि भाजपा नेते विनोद नारायण झा यांनी केली होती.