काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री समृती इराणी यांनी वॉक-इन लसीकरणावरून राहुल गांधींवर “बोया पेड बबूल का, आम कहाँ से होय”, अशी खोचक टीका केली होती. आता पुन्हा एकदा केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. यावेळी राहुल गांधींनी केंद्र सरकारच्या लसीकरण कार्यक्रमावरून आणि करोनाच्या एकंदर हाताळणीवरून टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. तसेच, करोनासंदर्भात राहुल गांधींनी श्वेतपत्रिका देखील प्रसिद्ध केली आहे. या पार्श्वभूमीवर स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचं नाव न घेता त्यांना खोचक शब्दांमध्ये सुनावलं आहे!

ग्यानी बाबा…!

आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना टार्गेट केलं आहे. “ग्यानी बाबा पंतप्रधान नरेंद्र मोदींना ज्ञान देत असताना त्यांनी काही गोष्टींवर आत्मपरीक्षण करण्याचीही गरज आहे. करोनाची दुसरी लाट कुठून सुरू झाली? काँग्रेस शासित राज्यांमध्ये. कोणत्या राज्यामध्ये देशात सर्वाधित करोना रुग्ण आणि करोना बळी आहेत? काँग्रेस शासित राज्यांमध्ये. सर्वाधिक मृत्यूदर असणारी राज्य – काँग्रेसशासित राज्य. काँग्रेस शासित राज्यांमध्येच सर्वाधिक प्रमाणात लसीकरणाविरोधात आवाज उठत असून त्यामुळे लस घेण्यात टाळाटाळ केली जात आहे”, असा दावा स्मृती इराणी यांनी केला.

 

लसीकरणाच्या विकेंद्रीकरणाची मागणी कुणी केली?

दरम्यान, या ट्वीटमध्ये स्मृती इराणी यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. “करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये काँग्रेस शासित राज्यांमध्येच मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्हिटी रेट आढळून आला. लसीकरणाच्या विकेंद्रीकरणाची मागणी कुणी केली? आणि त्यानंतर पुन्हा त्यावरून घुमजाव कुणी केलं? काँग्रेसने. देशानं जेव्हा ८३ लाख लसी एका दिवसात देऊन जगात विक्रम प्रस्थापित केला, तेव्हा सर्वात कमी लसीकरण कुठे झालं? तेही काँग्रेस शासित राज्यात झालं”, असं स्मृती इराणी ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.

 

समझ जाये, तो बेहतर है…!

दरम्यान, या ट्वीटमध्ये त्यांनी खोचक टोला देखील लगावला आहे. “कहावत है, दिया तले अंधेरा. समझ जाये, तो बेहतर है”, असं या ट्वीटमध्ये स्मृती इराणी म्हणाल्या आहेत.

Covid 19:…तुमचे अश्रू जीव वाचवू शकत नाहीत; राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल

याआधी देखील “कहत कबीर – बोया पेड बबूल का, आम कहाँ से होय. समझने वाले समझ गए होंगे. केंद्र सरकार ने पहले से ही Walk-in रजिस्ट्रेशन के लिए राज्यों को स्वीकृति दे दी है. भ्रम ना फैलाए, टीका लगवाए”, असं ट्वीट करत त्यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं होतं.