महेश सरलष्कर, नवी दिल्ली

दुबळा झालेला काँग्रेस पक्ष, इंडियन नॅशनल लोकदलमधील दुफळी कोणतेही आव्हान देऊ  शकत नाही, असा आत्मविश्वास हरयाणातील सत्ताधारी भाजपला वाटत आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ‘अब की बार पचहत्तर पार’चा नारा दिला आहे.  राष्ट्रवादी मुद्दय़ांवरच भाजपने जोर दिला आहे. पण जाट आणि मुस्लीम समाजांच्या नाराजीमुळे भाजपपुढे आव्हान आहे.

चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरयाणातील सर्व दहा जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्याआधी जाट समाजाचे प्रभुत्व असलेल्या जिंद विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपच्या उमेदवाराने काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांचा पराभव केला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जाट विरुद्ध बिगरजाट असा सामना रंगणार असला तरी भाजपने जाट आमदारांना पक्षात आणून हरयाणातील प्रबळ जातसमूहाचीही मतेही मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

चौताला कुटुंबाच्या इंडियन नॅशनल लोकदल (आयएनएलडी)मधील १७ जाट आमदार भाजपमध्ये आले. दोन काँग्रेस आणि एक अपक्ष अशा २० बंडखोर आमदारांचे समर्थन भाजपने गेल्या पाच वर्षांमध्ये मिळवले.

जाट २८ टक्के

हरयाणामधील ३६ प्रमुख समूहांपैकी जाट मतदार २८ टक्के आहेत. उर्वरित ३५ समाजांतील मतदार सुमारे २७ टक्के आहेत. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे जाट समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. २०१६ मध्ये जाटांनी आरक्षणासाठी केलेले आंदोलन हिंसक बनले होते, पण या आंदोलनाने बिगरजाट समाज भाजपमागे एकवटला गेला. भाजपसाठी खट्टर हा हुकमी एक्का ठरला आहे. खट्टर बिगरजाट असले तरी त्यांनी स्वत:ची प्रतिमा जाणीवपूर्वक सर्वसमावेशक बनवली आहे. जाटांचे आंदोलन आणि राम रहिमची अटक या दोनच घटना खट्टर यांच्या नेतृत्वाला आव्हान देऊन गेल्या.

दक्षिण हरयाणावर लक्ष

मुस्लीमबहुल दक्षिण हरयाणात गेल्या वेळी भाजपला एकच जागा मिळाली होती. या भागातील मतदारसंघ काबीज करण्याचे दुसरे आव्हान भाजपसमोर आहे. मेवातसारख्या मागास ग्रामीण भागातील मुस्लिमांनी नेहमीच आयएनएलडी वा काँग्रेसला मतदान केले आहे. पण या भागात विकास योजना पोहोचवणे आणि तिहेरी तलाकबंदीच्या मुद्दय़ावर मुस्लीम महिला मतदारांची मते मिळवण्याचा प्रयत्न भाजपने केले आहेत. दक्षिण हरयाणातील काही मतदारसंघांतून एनआयएलडीतून आयात केलेल्या मुस्लीम उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. नैक्षम चौधरी या उच्चशिक्षित मुस्लीम महिलेलाही भाजपने उमेदवारी दिलेली आहे. या वेळी भाजपने दक्षिण हरयाणावर लक्ष केंद्रित केले आहे.

निवडणुकीच्या तोडांवर काँग्रेसमध्ये बेदिली आहे. राहुल गांधींच्या राजवटीत प्रबळ जाट नेता आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुडा बाजूलाच पडले होते. शिवाय, लोकसभा निवडणुकीत हुडा पिता-पुत्रांना पराभव पत्करावा लागला होता. सोनियांनी त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याला  उशीर झाला होता. अशोक तन्वर यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेऊन ते कुमारी सेलजा यांना दिले गेले. तन्वर यांनी दिल्लीत सोनियांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करून पक्षश्रेष्ठींनाच आव्हान दिले. अखेर तन्वर यांनी काँग्रेस पक्षालाच रामराम ठोकला.

चौतालांची स्थिती बिकट

* ओमप्रकाश चौताला यांच्या आयएनएलडी पक्षाची अवस्था काँग्रेसपेक्षाही वाईट झालेली आहे. सहा वर्षे तुरुंगात राहिलेले ओमप्रकाश पॅरोलवर बाहेर आले असून निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. पण त्यांच्या पक्षात कौटुंबिक कलहामुळे फूट पडली आहे.

*ओमप्रकाश यांच्या अनुपस्थिती पक्ष सांभाळणारे त्यांचे पुत्र अभय यांनी भाचा दुष्यंत याला पक्षातून बाहेर काढले. दुष्यंतपुढे राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिल्याने त्याने जननायक जनता पक्ष (जेजेपी) काढला.

* गेल्या वेळी आयएनएलडी १९ जागा मिळवून हा प्रमुख विरोधी पक्ष बनला होता, पण त्यापैकी १७ आमदार भाजपमध्ये गेले. याशिवाय आप, अकाली दल, योगेंद्र यादव यांचा स्वराज इंडिया असे छोटे पक्षही रिंगणात उतरलेले आहेत.

* २०१४ मध्ये ११६ महिला उमेदवार होत्या, या वेळी ही संख्या ५० वर आलेली आहे. त्यापैकी १२ महिला उमेदवार 8भाजपच्या आहेत. कुस्तीगीर बबिता फोगट, टिकटॉकस्टार सोनाली फोगट असे नवे चेहरेही भाजपने दिले आहेत.

* भाजपने जाहीरनाम्यात ९५ टक्के स्थानिकांना नोकरीत आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय, छोटय़ा शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत व्याजमुक्त कर्ज, दलितांना तीन लाखांचे विनातारण कर्ज अशा लोकप्रिय घोषणा भाजपने जाहीरनाम्यात केल्या आहेत.

* काँग्रेसनेही शेतकऱ्यांना कर्जमाफी, नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के महिलांना आरक्षण, पंचायतराजमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण अशी आश्वासने दिली आहेत