25 February 2021

News Flash

हवामान बदलांत टिकतील अशा पायाभूत सुविधा निर्माण करा

उत्तराखंड दुर्घनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे आवाहन

(संग्रहित छायाचित्र)

 

हवामान बदलांचे अनेक धोके असून उत्तराखंडसारख्या दुर्घटना त्यामुळेच घडत आहेत, परिणामी भारतीय तंत्रज्ञान संस्थांनी हवामान बदलांच्या धोक्यातही टिकाव धरू शकतील अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी संशोधन करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

खरगपूर आयआयटीच्या ६६ व्या पदवीदान समारंभानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना सेल्फ ३ हा मंत्र दिला. आत्मविश्वास, नि:स्वार्थीपणा व स्वजागृतता या तीन गोष्टींना महत्त्व दिले तरच नवोद्योग लोकांच्या जीवनात बदल घडवून आणू शकतील. सुरक्षित, किफायतशीर, पर्यावरणस्नेही ऊर्जा पर्याय शोधण्याची गरज असून आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसारखे उपक्रम त्यासाठी पथदर्शक आहेत असे त्यांनी सांगितले. हवामान बदल हे मोठे आव्हान असून त्यामुळे अनेक दुर्घटना होत आहेत. पायाभूत सुविधाच नष्ट झाल्याचे उदाहरण आपण उत्तराखंड दुर्घटनेत पाहिले आहे त्यामुळे यापुढे अशा दुर्घटनांतही टिकाव धरू शकतील अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन हा भारतासाठीच नव्हे तर जगासाठी महत्त्वाचा विषय बनल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, उत्तराखंडमध्ये काय घडले ते तुम्ही पाहिलेच, त्यामुळे अशा आपत्तीतही टिकाव धरू शकणाऱ्या पायाभूत सुविधा तयार करण्याचे आव्हान तंत्रज्ञांपुढे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या २०१९ मधील दी ग्लोबल कोअ‍ॅलिशन फॉर डिझास्टर रिसायलियंट इन्फ्रास्ट्रक्चर  या संस्थेच्या स्थापनेचा उल्लेख त्यांनी केला. सीडीआरआय ही संस्था देशातील सरकार, संयुक्त राष्ट्रांच्या संस्था, बहुउद्देशीय विकास बँका, वित्त पुरवठा संस्था, खासगी क्षेत्र, ज्ञान संस्था यांना एकत्र आणून हवामान व आपत्ती जोखीम, शाश्वत विकासावर काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.  करोनाप्रतिबंधाच्या तंत्रज्ञानाबद्दल त्यांनी  खरगपूर आयआयटीची प्रशंसा केली.

भारताला आरोग्य क्षेत्रात आघाडीवर ठेवणार

नवी दिल्ली : सरकारने आरोग्य सेवेविषयी सर्वंकष दृष्टिकोन अंगीकारला असून उपचार व निरोगी आयुष्य यावर लक्ष केंद्रित केले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पातील आरोग्यविषयक तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत आयोजित एका चर्चासत्रात सांगितले. ते म्हणाले की, आरोग्य खात्यासाठी सर्वात मोठी तरतूद करण्यात आली असून सरकार आरोग्यासाठी वचनबद्ध असल्याचे त्यातून दिसून येते.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, आरोग्यसेवा उपवब्धता, किफायतशीरता  या पुढच्या पायऱ्या असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या शक्य होणार आहेत. भारताला आरोग्यवान ठेवण्यासाठी सरकार चार आघाडय़ांवर काम करीत असून निरोगीत्वासाठी आरोग्यसेवा, दर्जाचे उन्नयन, सर्वांना आरोग्य सेवा, आरोग्य पायाभूत सुविधा यावर आम्ही काम करीत आहोत. सर्व प्रश्न सोडवण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. कोविड १९ साथीच्या काळात आरोग्य क्षेत्रात भारताची ताकद जगाने अनुभवली आहे. जगात भारतातील आरोग्य क्षेत्राची प्रतिमा कोविड काळात उंचावली आहे. भारतीय डॉक्टर्स व निम वैद्यकीय कर्मचारी यांना जगात मागणी वाढली आहे. भारतात लशींचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात केले जात असून ते आणखीही वाढवले जाऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:00 am

Web Title: build infrastructure that will withstand climate change abn 97
Next Stories
1 गुजरात – काँग्रेसने अहमद पटेल यांची जागाही गमावली; भाजपाने दोन्ही जागा बिनविरोध जिंकल्या
2 महाराष्ट्र आणि अन्य राज्यातील करोना वाढीचा परस्पराशी संबंध नाही
3 ‘थँक्यू गुजरात’, महापालिका निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
Just Now!
X