भारतरत्न सी एन आर राव यांचे प्रतिपादन

उच्च शिक्षणाच्या जागतिक क्रमवारीत भारताच्या काही विद्यापीठांनी मानाचे स्थान मिळविलेले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विज्ञान आणि संशोधनातील उत्कृष्टतेसाठी भारताला आणखी मानवी प्रयत्नांची गरज असल्याचे मत भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेले शास्त्रज्ञ सी एन आर राव यांनी व्यक्त केले. हमदर्द विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते.

सरकारकडून विद्यापीठांमधील संशोधनासाठी करण्यात येणाऱ्या थोडक्या आर्थिक मदतीबाबत राव म्हणाले की, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रासाठी सरकारने सर्व पातळ्यांवर पाठिंबा देणे गरजेचे आहे. जागतिक पातळीवरील अव्वल १०० विद्यापीठांमध्ये अधिकाधिक भारतीय विद्यापीठांनी स्थान मिळवावे यासाठी सरकारने निश्चित ध्येय ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक मदतीशिवाय हे शक्य नसल्याचेही राव यांनी स्पष्ट केले. विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात झपाटय़ाने बदल होत असताना भारतीय संशोधकांनी ध्येय ठेवून रुची असलेल्या विषयात सखोल संशोधनाला झोकून देण्याची गरज असल्याचेही राव म्हणाले.

चीन, दक्षिण कोरिया या देशांमध्ये विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात अतिशय गतीने प्रगती होत आहे. त्यामुळे अध्यापक आणि संशोधकांनी कठोर परिश्रम घेऊन कार्यरत राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सहजपणे आयुष्य जगत विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात प्रगती करणे अशक्यप्राय असल्याचेही त्यांनी सांगितले. संशोधन क्षेत्रातील अत्युच्च योगदानासाठी राव यांना हमदर्द विद्यापीठाकडून मानद डी.एससी पदवी प्रदान करण्यात आली.