सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शनबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच ख्यातनाम लेखिका तस्लिमा नसरीन यांनी अमेरिका-युरोपप्रमाणे गांजाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी केली आहे.

तस्लिमा नसरीन यांचं एक ट्विट सध्या चर्चेत आहे. हे ट्विट त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आलं आहे. “अमेरिकेत काही राज्यांमध्ये पूर्णपणे तर काही ठिकाणी अंशत: गांजाला कायदेशीर मान्यता देण्यात आलीये. युरोपमध्येही वैद्यकीय कारणांसाठी गांजाचा वापर करण्याची परवानगी आहे. गांजाला कायदेशीर परवानगी मिळायला हवी…ताण आणि वेदना कमी करण्यासाठी ज्याला गरज आहे त्याला गांजाच्या वापराची परवानगी असावी. मी स्वत: ‘स्मोक’ करत नाही…मला याची गरज नाही…. पण मी इतरांचा विचार करतेय”, असं म्हणत तस्लिमा नसरीन यांनी गांजाला कायदेशीर परवानगी देण्याची मागणी केली आहे.

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींची ड्रग्ज प्रकरणी चौकशी होत असल्याने सध्या देशभरात हा विषय चर्चेत आहे. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांच्यासहित अनेकांची ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून चौकशी सुरु आहे. अशातच तस्लिमा नसरीन यांच्या गांजाला कायदेशीर करण्याच्या मागणीमुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

कोण आहेत तस्लिमा नासरीन?

तस्लिमा नसरीन या बांगलादेशी लेखिका आहेत. ‘लज्जा’, फेरा, बेशरम या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या आहेत. त्यांनी मुस्लीम समाजातील अनिष्ट प्रथांवर ताशेरे झाडल्याने त्यांना बांगलादेशातून बहिष्कृत करण्यात आले. त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या फतव्यामुळे त्यांना बांगलादेश सोडावा लागला. मात्र भारताविषयी त्यांच्या मनात आदर आणि प्रेम आहे. भारताने त्यांना आश्रयही दिला आहे.