कोळसा खाण घोटाळ्याचा तपास करणाऱया केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पथकामध्ये आणखी एका अधिकाऱयाचा समावेश करावा, या मागणीसाठी सीबीआयने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. या घोटाळ्याचा तपास करणाऱया सीबीआयच्या पथकामध्ये कोणताही बदल करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले असल्यामुळेच नव्या अधिकाऱयाचा समावेश करण्यास मंजुरी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्याची चौकशी करणाऱया पथकामध्ये आणखी एका अधिकाऱयाचा समावेश करण्यामागचे कारण बंद पाकिटामध्ये मंगळवारी या खटल्याची सुनावणी सुरू असलेल्या पीठाकडे सोपविण्यात येणार आहे. न्या. आर. एम. लोढा यांच्या नेतृत्त्वाखालील पीठाकडे या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सीबीआय नव्या अधिकाऱयाचे नाव आणि त्याचे वैयक्तिक माहितीपत्रकही बंद पाकिटामध्ये न्यायालयाकडे देणार आहे.