भारतातील नक्षलवादी कारवायांसाठी १५ देशांमधून पैसा गोळा केल्याचा आरोप असलेला सीपीआयचा प्रतिनिधी अभय नायक याला छत्तीसगढ पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २०१७ मध्ये आयईडी स्फोटके आणि इतर बंदी असलेली पुस्तके जप्त करण्यात आली होती.
Chhattisgarh: Police in Bastar arrested Abhay Nayak, a resident of Bengaluru on charges of arranging funds for Maoists from more around 15 countries including Belgium, Singapore and Nepal.
— ANI (@ANI) June 13, 2018
पोलिसांच्या माहितीनुसार, नायक आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपली ओळख गुप्त ठेवण्यासाठी तसेच नक्षलवादी कारवायांसाठी तरुणांना आकर्षित करण्यासाठी तो विविध माध्यमांचा वापर करीत होता. नायक दक्षिण आशियातील माओवाद्यांच्या सहकार्य समितीमध्ये सहभागी होता. शहरी भागात माओवाद्यांचे जाळे उभारण्यात त्याचा सहभाग होता. पोलिसांनी मे २०१७मध्ये त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीसही बजावली होती. त्यानंतर १ जून रोजी त्याला दिल्ली विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले, असे बस्तरचे पोलिस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी सांगितले आहे.
अभय देवदास नायक उर्फ लोड्डा हा मुळचा बंगळूरूचा रहिवासी असून तो गेल्या एक ते दीड वर्षांपासून बस्तर पोलिसांच्या आणि राज्य गुप्तचर विभागाच्या रडारवर होता. नक्षलविरोधी विशेष पोलिस महानिरिक्षक डी. एम. अवस्थी म्हणाले, तो शहरी नक्षल विंग पथकाचा सदस्य होता, तसेच नक्षली विचार पसरवण्यात त्याचा हात होता.
पोलिसांनी सांगितले की, नायक अनेक माओवाद्यांच्या समर्थकांसह रोना विल्सन आणि प्रा. शोमा सेन यांच्या संपर्कात होता. या दोघांसह पाच जणांना पुणे पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले असून त्यांचा १ जानेवारीला पुण्यातील कोरेगाव भीमा हिंसाचारात सहभाग असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
दरम्यान, नायकने २०१७ मध्ये बेल्जिअम, फ्रान्स, युके, मेक्सिको, इक्वेडॉर, बोलिविया, कंबोडिया, सिंगापूर, इंडोनेशिया, रशिया आणि नेपाळ या १५ देशांना भेटी दिल्या आहेत. या देशांच्या भेटींदरम्यान त्यांनी माओवाद्यांसाठी पाठींबा आणि पैसा जमवण्याचे काम केले आहे. दरम्यान, त्याने बस्तरला दोन वेळेस भेट दिली आहे.
मात्र, नायकने माध्यमांशी बोलताना आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून आपण मुक्त पत्रकार असून माओवाद्यांबद्दल आपण केवळ लिहीतो असे त्याने म्हटले आहे. त्याचबरोबर त्याचे वडिल देवदास दामोदर नायक यांनी आपल्या मुलावरील आरोप चुकीचे असून तो निरपराध असल्याचे इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.