लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या ‘चौकीदार’ शब्दावरुन जोरदार राजकारण सुरु असताना मध्य प्रदेशात एका चौकीदाराच्या मुलाने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत तब्बल ९९.८ टक्के गुण मिळवले. आयुष्मान ताम्रकार असे या प्रतिभावान मुलाचे नाव आहे. त्याचे वडिल विमल ताम्रकार चौकीदारीचे काम करतात.

वडिलांचे चौकीदारीचे काम थांबवण्यासाठी १६ वर्षीय आयुष्मानला शिकून इंजिनिअर बनण्याची इच्छा आहे. माझ्यासाठी भावंडांसाठी वडिलांचा संघर्ष पाहून मला दु:ख होते. फक्त ४ हजार रुपये त्यांना वेतन मिळते असे आयुष्मानने सांगितले. आयुषमानचे वडिल विमल ताम्रकार एक लग्नाच्या हॉलमध्ये चौकीदारीचे काम करतात.

आयुष्मानकडे पाहून त्यांच्या बहिणींना सुद्धा प्रेरणा मिळाली. आयुष्मानची आई घराला हातभार लावण्यासाठी नोकरी करते. आयुष्मानने बोर्डाच्या परिक्षेत ५०० पैकी ४९९ गुण मिळवले. खासगी शिकवणी लावण्यासाठी एकदा वडिलांना विचारले होते. ती आठवण त्याने सांगितली. फी जास्त असल्यामुळे वडिल काहीच बोलले नव्हते.

पण त्यांनी पैशांची जमवाजमव सुरु केली होती. ज्यादिवशी मला हे समजले तेव्हा मी अभ्यासात सर्वोत्तम कामगिरी करुन शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवण्याचे मनाशी पक्के केले होते. एकदिवस मी कुटुंबाच्या सर्व अपेक्षा पूर्ण करेन हा मला विश्वास आहे असे आयुष्यमानने सांगितले. वडिल नसताना अनेकदा आयुष्मानला चौकीदारीचे काम करावे लागले आहे. वडिल आजारी असताना काही वेळा मी रात्रपाळीला जायचो. त्यावेळी बहिणी घरामध्ये आईला कामामध्ये मदत करायच्या असे आयुष्मानने सांगितले.