देशात करोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. देशभरातल्या दैनंदिन करोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. उत्तरप्रदेशातही गेल्या दोन महिन्यात पहिल्यांदाच १५०० पेक्षा कमी करोनाबाधित आढळून आहेत. त्यामुळे उत्तरप्रदेश सरकारने आता रुग्णालयांमधला बाह्यरुग्ण विभाग अर्थात ओपीडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तरप्रदेशात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रांमधली ओपीडी आजपासून सुरु कऱण्यात येत आहे. त्यामुळे इतर आजार असलेल्या रुग्णांसाठी ही दिलाादायक बाब आहे. गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक रुग्णालयांचा बाह्यरुग्ण विभाग बंद होता. पण आता करोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने सरकारने पुन्हा एकदा ओपीडी सुरु कऱण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे करोना व्यतिरिक्त इतर आजार असणाऱ्या नागरिकांचे उपचार आणि करोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या शस्त्रक्रिया आता करता येणार आहेत.

आणखी वाचा- Coronavirus: “अमेरिका आणि युरोपपेक्षा उत्तर प्रदेशमध्ये मृत्यूदर कमी”; योगींनी थोपटली स्वत:चीच पाठ

गरोदर महिलांच्या सोयीसाठी आता ऑपरेशन थिएटर्ससुद्धा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ऑनलाईन पद्धतीने एक उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये त्यांनी मेडिकल कॉलेजेस आणि आरोग्य विभागाच्या रुग्णालयातल्या जनरल ओपीडीमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या ठरवून देण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्ण ई-संजीवनी या मोबाईल अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकतात असंही या बैठकीत सांगण्यात आलं. त्याच बरोबर सार्वजनिक ठिकाणी करोना प्रतिबंधक सर्व नियम पाळण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

आणखी वाचा- उत्तर प्रदेशात लॉकडाउन शिथील; महाराष्ट्रातही होणार का?

दोन दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यामध्ये राज्य सरकारला यश आल्याचं सांगताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याची तुलना थेट अमेरिका आणि युरोपशी केली. राज्यातील करोना परिस्थिती हाताळताना राज्य सरकार २०२० पासूनच चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचं योगींनी लखनऊमधील एका कार्यक्रमात म्हटलं. राज्यातील दर १० लाख लोकसंख्येमागे करोना मृतांचा आकडा ४७ इतका असल्याचं योगींनी सांगितलं. इतकंच नाही राज्य सरकारची कामगिरी किती चांगली आहे हे सांगताना या मृत्यूदराची तुलना योगींनी अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रासोबत केली. अमेरिका आणि युरोपमधील प्रगत राष्ट्रांमध्ये अधिक चांगल्या आरोग्य सुविधा असूनही तेथे दर १० लाखांमागे १८०० ते २१०० जणांचा मृत्यू झाल्याचं योगींनी म्हटलं आहे.