लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर संघटनेची भाकरी फिरवण्यासाठी पक्षाच्या घटनेत आवश्यक दुरुस्त्या करण्यावर काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत आज मंगळवारी चिंतन करण्यात आले. विशेष म्हणजे अलीकडेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष करण्याची मागणी केली होती. त्यावर काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत चर्चा झाली नसल्याचा दावा पक्षसूत्रांनी केला. मात्र संघटनात्मक पदांसाठी कालमर्यादा निश्चित करण्याचा प्रस्ताव बैठकीत उपस्थित अनेक सदस्यांनी मांडला. त्यासाठी पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करावी लागणार असल्याने संघटनात्मक निवडणुका लांबण्याची शक्यता आहे.
कार्य समितीच्या बैठकीत बोलताना सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी असल्याचे सांगून सोनिया यांनी स्वपक्षाच्या नेत्यांनादेखील चिंतनाचा सल्ला दिला. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकांमधील पराभवाच्या धर्तीवर सभोवती काय चालले आहे, याचीही दखल घेण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्यात केंद्र सरकारने सात महिन्यांच्या कार्यकाळात आणलेल्या दहा अध्यादेशांचा उल्लेख होता. त्या म्हणाल्या की, संसदीय कामकाजातील सारे संकेत बाजूला सारून मोदी सरकारने अध्यादेश आणले. यामागे केंद्र सरकारचा काय उद्देश आहे, असा प्रश्न सोनिया यांनी उपस्थित केला. सतत अध्यादेश आणणे हे जणू काही हुकूमशाही प्रवृत्तीचे लक्षण आहे, अशा आक्रमक शब्दांत सोनिया यांनी मोदींवर हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी सातत्याने महागाई कमी केल्याचा दावा करतात. प्रत्यक्षात त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न किती घटले आहे, याची आकडेवारी द्यायला हवी. जमीन अधिग्रहण विधेयकातील बदलांवर सोनिया गांधी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सामाजिक पाहणीची तरतूद वगळल्याने मोठय़ा प्रमाणावर बेरोजगार निर्माण होतील. जमीन अधिग्रहण विधेयकातील बदल शेतकरीविरोधी आहेत. सलग चार तास चाललेल्या या बैठकीत उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, ए.के. अँटोनी, मुकुल वासनिक, विलास मुत्तेमवार, जनार्दन द्विवेदी, दिग्विजय सिंह आदी नेते उपस्थित होते.

दिल्लीत काँग्रेसचा बचावात्मक पवित्रा
गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला गांभीर्याने न घेतल्याने सुपडा साफ झालेल्या काँग्रेसने यंदा सावधपणे रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. ज्यात आपवर थेट टीका न करता काँग्रेसच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या विविध विकासकामांची माहिती देण्यावर भर दिला जाणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जातीय समीकरणांवर भर दिला जाणार आहे. गत निवडणुकीत काँग्रेसचे चार मुस्लीम आमदार विजयी झाले होते. त्याच विजयी मतदारसंघांवर काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख अजय माकन यांनी लक्ष केंद्रित केले आहे. माजी केंद्रीय मंत्री अजय माकन खांद्यावर काँग्रेस नेतृत्वाने दिल्ली विधानसभेची धुरा सोपवली आहे. माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या समर्थक नेत्यांचा गट त्यामुळे नाराज असल्याने माकन यांच्यासमोरची डोकेदुखी वाढली आहे. याशिवाय प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली यांच्याही समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अरविंद केजरीवाल यांच्याखालोखाल सर्वाधिक सभा घेणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये अरविंदर सिंह लवली याचा क्रमांक आहे. गेल्या दोन दिवसात लवली यांनी दोन डझन सभा घेतल्या आहेत. काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेल्या दिल्लीच्या वाल्मीकी समुदायाच्या मतदारांनी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला समर्थन दिले होते.