दिल्लीत लॉकडाउन आणि रुग्णालयात वैद्यकीय उपकरणांचा वेळेवर पुरवठा होत असल्याने गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत समाधान व्यक्त करत पत्रकार परिषद घेतली. गेल्या २४ तासात ८ हजारांपेक्षा कमी करोना रुग्ण आढळल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत नमूद केलं. यावेळी करोनामुळे अनाथ झालेली मुलं आणि निराधार वृद्धांसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. अनाथ मुलांचं संगोपन आणि शिक्षणाचा खर्च दिल्ली सरकार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

करोनामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक मुलांनी आपल्या आई वडिलांना गमावलं आहे. तर वृद्ध दाम्पत्यांनी आपल्या कमवत्या मुलांना गमवल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. यासाठी दिल्ली सरकारने एक पाऊल पुढे टाकत मदतीचा हात दिला आहे. अनाथ मुलं आणि वृद्ध दाम्पत्यांचा खर्च दिल्ली सरकार उचलणार आहे.

“वृद्ध दाम्पत्यांचा कमवता मुलगा गेल्याने आता घर चालवण्यासाठी कुणी नाही. अशा कुटुंबांची मदत दिल्ली सरकार करणार आहे. काही मुलांनी आपल्या आई वडिलांना गमावलं आहे. त्या मुलांनी चिंता करू नये. आम्ही त्यांच्यासोबत आहोत”, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

तुरुंगातील करोना रुग्णांची सेवा करायचीय, परवानगी द्या; तिहारमधील अल-कायदाच्या दहशतवाद्याची याचिका

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे, एप्रिल महिन्यात करोना रुग्णांची संख्या २८ हजारांच्या पार पोहोचली होती. मात्र गेल्या २४ तासात करोनाबाधितांचा दर १२ टक्क्यांवर आला आहे. असं असलं तरी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.