पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार करोना विरुद्धच्या संकटाला सक्षमपणे तोंड देण्यास समर्थ असल्याचे मत एका सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या भारतीयांपैकी ८७ टक्के भारतीयांनी नोंदवलं आहे. इप्सॉस (Ipsos) या बहुराष्ट्रीय कंपनीने केलेल्या सर्वेक्षणामधून ही आकडेवारी समोर आली आहे. कंपनीने २३ एप्रिल ते २६ एप्रिलदरम्यान जगभरातील १३ देशांमध्ये २६ हजार जणांची मते जाणून घेतल्यानंतर या सर्वेक्षणाचा अहवाल तयार केल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. सर्वेक्षण करण्यात आलेल्या १३ पैकी ९ देशामधील बहुतांश नागरिकांनी त्यांच्या देशातील सरकार हे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य पावले उचलत असल्याचे मत या सर्वेक्षणादरम्यान नोंदवलं आहे.

“करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने तातडीने लॉकडाउनचा निर्णय घेतला. तसेच इतरही अनेक महत्वाचे प्रतिबंधात्मक निर्णय सरकारने तातडीने घेतले. आता सरकारकडून ग्रीन झोनमध्ये काळजीपूर्वपणे कारभार आणि उद्योगधंदे सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेतले जात आहेत. सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या बहुतांश लोकांनी सरकार ज्या पद्धतीने करोनाच्या साथीला तोंड देत आहे त्या प्रयत्नांचे कौतुक केलं आहे,” असं मत ‘इप्सॉस’चे प्रमुख कार्यकारी अधिकारी अमित अडारकर यांनी व्यक्त केलं आहे.

करोनाच्या साथीसंदर्भात जागतिक आरोग्य संघटना गांभीर्याने विचार करत नसल्याची टीका सुरुवातीला झाल्याचे पहायला मिळाले. मात्र आता अनेकांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कामाचे कौतुक केलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या १३ देशांपैकी ११ देशांमधील सर्वेक्षणात सहभागी झालेल्या नागरिकांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. या सर्वेक्षणामध्ये प्रामुख्याने शहरी भागांमधील नागरिकांची मते जाणून घेण्यात आली.

भारतामध्ये शहरी भागातील ७५ टक्के नागरिकांनी जागतिक आरोग्य संघटना चांगलं काम करत असल्याचं मत व्यक्त केलं आहे. याआधी घेण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करणाऱ्यांची संख्या ७५ टक्यांहून अधिक होती.