ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढावून घेतला आहे. देशामध्ये करोनामुळे दोन हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून देशावर करोनाचे संकट ओढावलेले असतानाच वैचारिक मतभेदांमुळे बोल्सोनारो यांनी देशाच्या आरोग्यमंत्र्यांनाच पदावरुन काढून टाकलं आहे. असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार बोल्सोनारो यांच्या या निर्णयामुळे देशातील जनतेने संताप व्यक्त केल आहे. आरोग्यमंत्री लुईझ हेनरिक मंडेटा हे बोल्सोनारो यांच्या सरकारमधील लोकप्रिय मंत्र्यांपैकी एक आहेत. सरकारने करोनाच्या संकटाला कसे तोंड द्यावे यासंदर्भामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि आरोग्यमंत्र्यांमध्येच मतभेद असल्याने राष्ट्राध्यक्षांनी आरोग्यमंत्र्यांनाच पदावरुन हटवल्याचे सांगितले जात आहे.

लुईझ हेनरिक मंडेटा यांनी ट्विटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. आपल्या व्हेरिफाइट ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करताना मंडेटा म्हणतात, “राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी काहीवेळापूर्वीच मला आरोग्य मंत्रालयामधून बडतर्फ करण्यात येत असल्याची माहिती दिली. देशाच्या आरोग्य व्यवस्थेचे व्यवस्थापन हाताळण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी आभार मानतो. तसेच आपल्या देशातील आरोग्य यंत्रणेसमोर असणाऱ्या करोनाच्या साथीचे व्यवस्थापन करण्याचीही संधी मला मिळाली. हे आपल्या आरोग्य यंत्रणेसमोरचे सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.”

‘गार्डीयन’मधील वृत्तानुसार मंडेटा यांना बडतर्फ करण्यात येणार असल्याची चर्चा मागील काही आठवड्यांपासून सुरु होती. बोल्सोनारो यांनी करोनाला जास्त महत्व न देता सोशल डिस्टन्सिंगचे नियम शिथिल करण्याच्या बाजूने मत मांडले होते. तर मंडेटा यांनी या धोरणाचा विरोध केला होता. मंडेटा यांनी ब्राझीलमधील करोनासंदर्भातील निर्णय ज्याप्रकारे घेतले होते त्यावरुन त्यांचे सर्व स्तरामधून कौतुक होताना दिसत होते. स्वत: डॉक्टर असणाऱ्या मंडेटा यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढली होती.

पुढील काही आठवड्यांमध्ये ब्राझीलमध्ये करोना संसर्गाचे प्रमाण वाढण्याची भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशाच आता आरोग्यमंत्र्यांनाच बडतर्फ करण्यात आल्याने सामान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “आतापर्यंत आपण करोनाला चांगल्या आणि योग्य पद्धतीने लढा दिला आहे. मात्र ही फक्त सुरुवात आहे,” असं मंडेटा यांनी आरोग्य मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना निरोपाच्या भाषणामध्ये सांगितलं. मंडेटा यांनी व्हिडिओच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

बोल्सोनारो हे सुरुवातीपासूनच लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या विरोधात आहेत. काही आठवड्यांपूर्वी त्यांनी, “लोक तर मरणारच पण त्यासाठी अर्थव्यवस्था बंद केली जाऊ शकत नाही,” असं धक्कादायक वक्तव्य केलं होतं. इतकचं नाही तर राज्यांचे गव्हर्नर मृतांचा आकडा फुगवून सांगत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण याचा कोणताही पुरावा ते सादर करु शकलेले नाहीत. याशिवाय काही आठवड्यापूर्वीपर्यंत बोल्सोनारो लोकांना कामावर परतण्याचं आवाहन करताना दिसत होते. असं न केल्यास अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असंही ते सांगताना दिसले होते. इतकंच नाही तर सोशल डिस्टन्सिंगचा सल्ला मान्य करण्यास त्यांचा सुरुवातीपासूनच नकार असून लोकांनी ते असंच आवाहन करत आहेत.