भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR)  करोनावरील उपचारासाठी गंगाजलवर संशोधन करणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. जल संसाधन मंत्रालयाने यासंदर्भातील मागणी आयसीएमआरकडे केली होती. अशाप्रकारचे संशोधन करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी अधिक वैज्ञानिक माहिती आणि आकडेवारीची गरज असल्याचे आयसीएमआरने स्पष्ट केलं आहे. आयसीएमआरकडे येणाऱ्या संसोधन प्रस्तावांचे मुल्यांकन करणाऱ्या समितीचे प्रमुख असणाऱ्या डॉक्टर व्हाय. के. गुप्ता यांनी, “सध्याची आकडेवारी ही इतकी ठोस नाहीय की ज्याच्या मदतीने करोनासंदर्भातील इलाज करण्यासाठी गंगेच्या पाण्यावर संशोधन करता येईल. हे प्रयोगशाळेतील संशोधन करण्याइतकी उर्जा आणि साधनांचा वापर करणारे आकडे नक्कीच नाहीत,” असं मत व्यक्त केलं आहे. यासंदर्भातील वृत्त ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

जल संसाधन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘गंगा स्वच्छता मोहिमे’ला अनेकांनी गंगेचे पाणी करोनावर उपचार करण्यासाठी वापरता येईल का यासंदर्भात प्रयोगशाळांमध्ये संशोधन होण्याची गरज आहे असे प्रस्ताव अनेकांनी पाठवल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. खास करुन गंगा नदीच्या किनारी राहणारे लोकं आणि वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांनी अशापद्धतीचे प्रस्ताव मांडल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. जल संसाधन मंत्रालयालयाकडे आलेले हे प्रस्ताव थेट आयसीएमआरला पाठवण्यात आले. एम्सचे माजी प्रमुख (डीन) असणाऱ्या गुप्ता यांनी, “सध्या परिस्थितीमध्ये अशाप्रकारचे संशोधन करण्यासाठी वैज्ञानिक माहितीचे पाठबळ, आकडेवारी, ठोस पुराव्यांची गरज असल्याची माहिती मंत्रालयाला कळवण्यात आली आहे,” असं स्पष्ट केलं.

‘गंगा स्वच्छता मोहिमे’च्या अधिकाऱ्यांनी या प्रस्तावांबद्दल राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (Neeri) वैज्ञानिकांशी चर्चा करण्यात आल्याचे स्पष्ट केलं आहे.  नीरीने गंगा नदीच्या पाण्यांची गुणवत्ता जाणून घेण्यासाठी एक संशोधन केलं होतं. या संशोधनामध्ये गंगेच्या पाण्यात रोग तयार करणाऱ्या विषाणूंच्या (बॅक्टेरिया) तुलनेत इतर जीवांवर जगणाऱ्या व्हायरसची संख्या जास्त असल्याचे दिसून आलं होतं. गंगा स्वच्छता मोहिमेचे अधिकारी नीरीच्या वैज्ञानिकांमध्ये झालेल्या चर्चेवेळी वैज्ञानिकांनी गंगेच्या पाण्यात व्हायरस रोखणारे कोणतेही गुण नसल्याचे स्पष्ट केलं होतं. आमच्या अभ्यासामध्ये अशाप्रकारचा कोणताही पुरावा आम्हाला सापडलेला नाही, असं वैज्ञानिकांनी गंगा स्वच्छता मोहिमेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं.

‘गंगा स्वच्छता मोहिमे’च्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे आलेले अनेक प्रस्ताव जसेच्या तसे आयसीएमआरला पाठवण्यात आल्याची माहिती दिली. हे प्रस्ताव २८ एप्रिल रोजी आयसीएमआरकडे पाठवण्यात आले होते. या प्रस्तांवपैकी एका प्रस्तावामध्ये गंगेच्या पाण्यामध्ये निंजा व्हायरस असल्याचा दावा करण्यात आला होता. तर दुसऱ्या एका प्रस्तावामध्ये गंगेचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढेल असा दावा करण्यात आला होता. तर तिसऱ्या प्रस्तावामध्ये गंगेच्या पाण्यामुळे व्हायरस नष्ट होऊ शकतो का यासंदर्भात संशोधन करण्याची मागणी करण्यात आली होती. आयसीएमआरकडून अद्याप आम्हाला कोणतेही अधिकृत उत्तर मिळालेलं नाही अशी माहितीही ‘गंगा स्वच्छता मोहिमे’च्या अधिकाऱ्यांनी दिली.