News Flash

मृतांना देण्यात आली रेमडेसिविर इंजेक्शन?; उत्तर प्रदेशमधील रुग्णालयाने दिले कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

३० एप्रिल रोजी गुन्हे शाखेच्या टीमने या रुग्णालयामधाली दोन कर्मचाऱ्यांना रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना रंगेहाथ पकडल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली

आकडेवारी तपासल्यास यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांचं नाव समोर येईल असं सांगितलं जात आहे. (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य : पीटीआय)

देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने मागील महिन्याभरापासून करोना उपचारासांसाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा तुटवडा जाणवत आहे. तुटवडा असणारं आणि सर्वाधिक चर्चेत ठरलेलं औषध म्हणजे रेमडेसिविर. आपल्या करोनाबाधित नातेवाईकांसाठी रेमडेसिविर मिळवण्यासाठी अनेकांनी जीवाचं रान केल्याच्या बातम्या मागील काही आठवड्यांमध्ये समोर आल्या आहेत. त्यातच या औषधाचा काळाबाजार होत असल्याने ते मिळणं खूपच कठीण झाल्याचंही पहायला मिळालं. असं असतानाच आता उत्तर प्रदेशमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला असून रेमडेसिविरच्या तुटवड्यासाठी येथील रुग्णालयामधील काही कर्मचारीच जबाबदार असल्याची माहिती समोर आलीय. कानपुरमधील हैलट रुग्णालयामधील करोना वॉर्डात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी मृत व्यक्तींच्या नावावर अनेक दिवस औषध साठ्यामधील रेमडेसिविर इंजेक्शन काळ्याबाजारात विकल्याची माहिती समोर आलीय. सर्वात संतापजनक बाब म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हव्यासापोटी ज्यांना या इंजेक्शनची गरज होती त्यांना हे इंजेक्शन रुग्णालयाकडे असूनही मिळालं नाही.

सामान्यपणे करोना वॉर्डमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना डॉक्टरांची चिठ्ठी असल्यावरच स्टोअर रुममधून रेमडेसिविरसारखी औषधं दिली जातात. मात्र न्यूरो सायन्स विभागाने केलेल्या तपासामध्ये अनेक मरण पावलेल्या व्यक्तींच्या नावे रेमडेसिविर इंजेक्शन स्टोअरमधून घेऊन जाण्याचं आल्याची माहिती समोर आलीय. म्हणजेच एखाद्या करोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही त्याच्या नावाने आरोग्य कर्मचारी रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णालयाच्या औषध साठ्यामधून मिळवत होते. आता यासंदर्भातील खुलासा झाल्यानंतर समोर येणाऱ्या माहितीमध्ये रुग्णालयातील अनेक मोठ्या डॉक्टरांचा यात समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

नक्की वाचा >> Coronavirus in UP : असंवेदनशीलतेचा कळस! रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर दीड महिन्यांनी फोन करून केली तब्येतीची चौकशी

कसा झाला खुलासा?

३० एप्रिल रोजी गुन्हे शाखेच्या टीमने हैलटमधील दोन कर्मचाऱ्यांना रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना रंगेहाथ पकडलं. त्यानंतर अमर उजालाने केलेल्या तपासामध्ये या रुग्णालयात रेमडेसिविर इंजेक्शनच्या संख्येमध्ये मोठा घोटाळा करण्यात आल्याची माहिती समोर आली. समोर आलेल्या माहितीनुसार डॉक्टरांच्या चिठ्ठीच्या आधारे करोना वॉर्डातील कर्मचारी आणि वॉर्ड बॉय रुग्णालयाच्या स्टोअरमधून मेलेल्या व्यक्तींच्या नावेही इंजेक्शन घ्यायचे. ही इंजेक्शन खूप नफा मिळवण्याचा हेतूने वाढीव दरात विकली गेल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. न्यूरो सायन्स विभागाच्या एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णालयातील रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापराची सगळी आकडेवारी काढली तर अनेक कर्मचाऱ्यांची नावं समोर येतील, असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> कहर… गप्पा मारता मारता नर्सने पाच मिनिटांमध्ये एकाच व्यक्तीला दिले करोना लसीचे दोन डोस

विशेष समितीची नेमणूक

या प्रकरणामध्ये कानपुरमधील गणेश शंकर विद्यार्थी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आर. बी. कलम यांनी चौकशी समितीची स्थापना केलीय. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, रेमडेसिविरच्या काळाबाजारासाठी मेलेल्या व्यक्तींच्या नावे ती मिळवण्याच्या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. एका समितीची स्थापना करण्यात आली असून सध्या या समितीकडून तपास सुरु आहे. रेमडेसिविर देण्यामध्ये सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शोध सुरु असल्याचं कमल यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 2:45 pm

Web Title: coronavirus in uttar pradesh remdesivir injections allotted in the name dead people scsg 91
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 अरविंद केजरीवाल यांची घोषणा! २०२२ मध्ये गुजरात विधानसभेच्या सर्व जागा ‘आप’ लढवणार
2 काही दिवस एकत्र राहणं म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ नाही – पंजाब हायकोर्ट
3 खळबळजनक! कसाई निघाला सीरियल किलर, घरात सापडली ३,७८७ मानवी हाडे
Just Now!
X