तुम्ही स्वतःला भारताचे पुत्र कसं काय समजता? या चीन आणि अमेरिकेने विचारलेल्या प्रश्नावर तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा यांनी त्यांना अतिशय सुंदर आणि भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरेल असे उत्तर दिले. या उत्तरावरुन दलाई लामांची भारताशी नाळ कशाप्रकारे जोडली गेली आहे, हेच प्रतित होते. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.

दलाई लामा म्हणाले, चीन आणि अमेरिकेच्या माध्यमांनी मला विचारले की, तुम्ही स्वतःला भारताचे पुत्र म्हणवता ते कसे? त्यावर मी त्यांना उत्तर दिले की, माझ्या डोक्यात नालंदा विद्यापीठाचे विचार आहेत. तर माझे भौतिक शरीर भारताच्या डाळ, चपाती आणि डोशावर जगत आहे. त्यामुळे मानसिक आणि शाररिकरित्या मी या देशाचा आहे, अशा प्रकारे मी भारताचा पुत्र आहे.

तिबेट हे बौद्ध राष्ट्र असून या तिबेटचे दलाई लामा सर्वोच्च धर्मगुरु आहेत. भगवान गौतम बुद्धाचा जन्म हा प्राचीन भारतात अर्थात आत्ताच्या नेपाळमधील लुंबिनी येथे झाला होता. त्यानंतर ज्ञानप्राप्तीनंतर त्यांची संपूर्ण कर्मभूमी ही भारतच राहिली. त्यांच्या काळानंतर पुढे अनेक वर्षांनी बौद्ध असलेल्या मौर्य शासकांच्या काळात कुमारगुप्त मौर्यने नालंदा विद्यापीठाची स्थापना केली होती. बिहारची राजधानी पाटणा शहरापासून ८८.५ किमी अंतरावर हे जगातील पहिले आणि प्राचीन भारतीय विद्यापीठ अस्तित्वात होते. अलेक्झांडर कनिंघम याने याचा शोध लावला.

दरम्यान, चिनी प्रवाशी हेनसांग ७ व्या शतकात भारताच्या दौऱ्यावर आला होता, त्यावेळी त्याच्या उपलब्ध साहित्यातून या विद्यापीठाबाबत विस्तृतपणे माहिती मिळते. या विद्यापीठात त्याकाळी १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत तर २००० शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत होते. अशा या उच्च ज्ञानसंपन्न विद्यापीठाच्या विचारांवर दलाई लामांनी आपले जीवन व्यतीत केले आहे.