माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानहून आलेल्या शिष्टमंडळात मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडलीचा भाऊ दानयाल गिलानीदेखील सहभागी होते. मिळालेल्या माहितीनुसार, वाजपेयींच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचे कायदा आणि माहिती मंत्री अली जाफर १७ ऑगस्टला भारतात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या तीन अधिकाऱ्यांपैकी एक दानयाल गिलानी होते. दानयाल गिलानी मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्यात प्रमुख भूमिका निभावणाऱ्या दहशतवादी डेव्हिड हेडलीचे सावत्र भाऊ आहेत. दोघांचे वडिल एकच आहेत, मात्र आई वेगळी आहे.

विशेष म्हणजे दानयाल गिलानी यांनी फक्त वाजपेयींच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावली नाही, तर केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेटदेखील घेतली. दानयाल गिलानी यांनी सुषमा स्वराज यांच्यासोबत झालेल्या भेटीचा व्हिडीओ ट्विट केल्यानंतर ही माहिती समोर आली. व्हिडीओत पाकिस्तानी शिष्टमंडळ भारतीय अधिकाऱ्यांची भेट घेताना दिसत आहे.

पाकिस्तानी परराष्ट्रमंत्रालयात अधिकारी असणाऱ्या दानयाल गिलानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीलाही हजेरी लावली होती. त्यावेळीही ते पाकिस्तानी शिष्टमंडळासोबत आले होते. विशेष म्हणजे त्यावेळीही कोणी त्यांना ओळखलं नव्हतं.

गेल्या आठवड्यात गुरुवारी अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन झालं. दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला उपस्थिती लावण्यासाठी पाकिस्तानकडून काही नावे सोपवण्यात आली होती. मैत्रीच्या नात्याने भारताने सर्वांना व्हिसा जारी केला होता अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जरी पाकिस्तानने दानयाल गिलानी यांना शिष्टमंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता, तरी भारत त्यांना थांबवू शकत नव्हता. त्यांचं नाव काळ्या यादीत किंवा भारतात प्रवेशबंदी असणाऱ्यांच्या यादीत नसल्याने तसं करणं शक्य नव्हतं. त्यांच्या नावे कोणताही रेकॉर्ड नसून, डेव्हिड हेडलीशी कोणताही संबंध नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

यामधील एक गोष्ट सरकारला खटकली आहे ती म्हणजे दानयाल गिलानी यांनी आपली ओळख उघड न करता किंवा कोणालाही डेव्हिड हेडलीशी आपला संबंध असल्याची माहिती मिळू न देता भारतात प्रवेश केला आणि निघून गेले. पाकिस्तानने भारतात येण्यासाठी दानयाल गिलानी यांची निवड करणेही भारतासाठी थोडं आश्चर्यकारकच आहे.