भारताच्या उपमहावाणिज्यदूत व आता संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी दूतावासात बदली झालेल्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्यावरील कारवाईचे प्रकरण अधिकच पेटले असून त्यांची संयुक्त राष्ट्रांच्या दूतावासात बदली केली असली तरी त्यांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने अटकेपासून किंवा खटल्यापासून संरक्षण देता येणार नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी शुक्रवारपासूनच नरमाईचा सूर आळवायला सुरुवात केली असून उभय देशांत हा पेच सोडविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचाही दावा केला आहे.
अमेरिका हा मोठा व्यापारी भागीदार आहे, हे मान्य करीत या प्रकरणातून लवकरच मार्ग निघेल अशी आशा खुर्शीद यांनी शनिवारी व्यक्त केली. उद्योगमंत्री आनंद शर्मा यांनी मात्र दोन्ही देशांतील व्यापारावर काही परिणाम होणार नाही, असे सांगितले.भारतीय औद्योगिक महासंघ ‘असोचेम’नेही उभय देशांतील व्यापारी संबंध तसेच विविध क्षेत्रांत विस्तारत असलेल्या परस्परसहकार्याचे भान ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
माजी आयएएस अधिकारी व देवयानीचे वडील असलेले उत्तम खोब्रागडे यांनी शनिवारी मुंबईत असा आरोप केला की, देवयानीकडे घरकामाला असलेली संगीता रिचर्ड ही सीआयएची हस्तक असू शकते.
अमेरिकेच्या परराष्ट्र प्रवक्त्या जेन साकी यांनी सांगितले की, खोब्रागडे यांना राजदूताचा विशेषाधिकार भारताने आता बहाल केला याचा अर्थ त्यांच्या याआधीच्या गुन्ह्य़ातून त्यांची निर्दोष सुटका झाली, असा होत नाही. तसेच विशेषाधिकार हे पद असेपर्यंतच असतात, असेही सूचक विधान करून खोब्रागडे यांचे नाव अमेरिकेच्या काळ्या यादीत कायमचेच राहणार असल्याचा संकेत साकी यांनी दिला. सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्याचा उल्लेख करून दोन्ही देश एकमेकांचे महत्त्वाचे भागीदार असून ही भागीदारी टिकवणे महत्त्वाचे असल्याचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी सांगितले.
आठवले अमेरिकेला जाणार
खोब्रागडेप्रकरणी लक्ष घालण्यासाठी आपण जानेवारीत अमेरिकेला जात असून वेळ पडली तर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचीही भेट घेऊ, असे रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी जाहीर केले. देवयानीचे वडील उत्तम खोब्रागडे यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली.