आम्ही कोणत्याही एका धर्माचे किंवा समुदायाचे राजकारण करीत नाही. भाजपचा ध्रुवीकरणाच्या राजकारणावर विश्वास नाही, असा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केला.

केरळ विधानसभेच्या प्रचारासाठी आले असता तिरुवंतपुरम येथे द इंडियन एक्सप्रेसशी ते बोलत होते. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालतो, असेही राजनाथसिंह म्हणाले. परंतु अल्पसंख्याकांचा भाजपवर विश्वास नाही, असे विचारले असता ते म्हणाले,  एलडीआएफ आणि यूडीएफ अल्पसंख्याकांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न आहेत. आमचे राजकारण सामान्य जनतेसाठी आहे. उत्तर प्रदेशात नन्सचा छळ झाल्याने त्यांचा परिणाम भाजपवर होणार नाही काय, अशी विचारणा केली असता केंद्र सरकार दोषींविरुद्ध कडक कारवाईसाठी कटीबद्ध आहे. कुणाचाही छळ होऊ नये. आम्हाला सर्वांना न्याय द्यायचा आहे. कोणाचेही संतुष्टीकरण करायचे नाही.

सबरीमाला मुद्यावर पक्षाला पाठिंबा मिळाला. मात्र, तसा पाठिंबा निवडणुकीत मिळू शकला नाही. त्यावर त्यांनी आम्ही सबरीमालासाठी कायदा केला. भाजप एका धर्माचे किंवा समुदायाचे राजकारण करीत नाही. लिंगभेद मानत नाही.

पश्चिम बंगालमध्ये अटीतटीची लढत आहे. पण आम्ही बाजी मारत आहोत. आमच्या २०० जागांचे लक्ष्य आहे. आसाममध्ये आम्हाला कोणाचेही आव्हान नाही. तेथे आम्ही सत्तेत परतत आहोत.

केरळमध्ये आमचे मतदार वाढले आहेत. यावेळी आमची मते वाढणार आहेत. त्यामुळे चांगल्या जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तामिळनाडूत रालोआ सरकार स्थापन करेल, असा विश्वासही सिंह यांनी व्यक्त केला.

चीनच्या प्रतिसादाची प्रतीक्षा

पांगोंग त्सोवरून माघारीच्या मुद्यावर चर्चा होऊन एक महिन्याहून अधिक काळ झाला. पण, त्यापुढे काही झाले नाही, असे विचारले असता चीनसोबत चर्चा सुरू आहे. हॉटलाईन संदेश आमच्याकडून गेला आहे. आता त्यांना प्रतिसाद द्यायचा आहे. आम्ही त्यांच्या प्रतिसादची प्रतीक्षा करीत आहोत, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.