राज्याराज्यातील भाजपच्या कार्यकारिणींनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करणारे प्रस्ताव संमत करण्याची घाई करू नये, असे आदेश पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांनी दिले आहेत.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांचे भारतीय जनता पक्षाचे प्रचारप्रमुख असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतच राजनाथ सिंग यांनी ही सूचना केली, हे विशेष. भाजपाच्या बिहार कार्यकारिणीने मोदी यांनाच भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले जावे, अशी मागणी करणारा ठराव संमत केला होता. त्या पाश्र्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी हा आदेश दिला आहे.
पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण याबाबतचा अंतिम निर्णय वरीष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूकीपूर्वीच पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याची भाजपाची परंपरा आहे. मोदी यांनाच ही उमेदवारी मिळावी, अशी बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांचा याला विरोध असल्याचेही बोलले जात आहे.
मोदींचे लक्ष अल्पसंख्य मतांकडे
भाजपच्या निवडणूक समितीच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष व सरचिटणीसांबरोबर रविवारी झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी समाजातील सर्व वर्गापर्यंत पोहोचा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. गुजरात निवडणुकीत आपल्याला अल्पसंख्याकांची २०-२५ टक्के मते मिळाल्याचा दावाही मोदी यांनी केला. मुस्लिमांमध्ये शिया, सुन्नी, बोहरा असे वेगवेगळे वर्ग असून त्यांच्या त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल, असेही मोदी यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 19, 2013 1:25 am