उत्तर प्रदेशात एका व्यक्तीने दंश करणाऱ्या सापाचे चावून तुकडे केल्याची धक्कादायक आणि तितकीच अजब घटना घडली आहे. रविवारी रात्री सापाने राजकुमार याच्यावर हल्ला करत दंश केला. यामुळे चिडलेल्या राजकुमार याने सापावर हल्ला करत त्याचा चावा घेतला. राजकुमार हा मुळचा इटाह येतील असरौली गावचा रहिवासी आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयात दाखल आहे.

“माझ्या मुलाने दारु प्यायलेली होती. साप आमच्या घऱात घुसला आणि दंश केला. यानंतर त्याने सापाचा चावा घेतला आणि त्याचे तुकडे केले. त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे. आमच्याकडे त्याच्या उपचारासाठी अजिबात पैसे नाहीत”, असं राजकुमारचे वडील बाबूराम यांनी सांगितलं आहे. डॉक्टरांनी राजकुमारची प्रकृती सध्या चिंतानजक असल्याचं सांगितलं आहे.

“रुग्णाने येऊन मी सापाला चावलं असल्याचं सांगितलं. साप त्याला चावला आहे असं मी चुकून ऐकलं आणि गैरसमज झाला. सध्या तो गंभीर आहे. त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी सांगण्यात आलं आहे”, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेनंतर राजकुमारच्या कुटुंबाने सापावर अंत्यसंस्कार केले.