News Flash

जेव्हा ‘नजरचुकी’ने खडसेंवर महिला अत्याचाराचे कलम लागते..

निवडणूक प्रतिज्ञापत्रात निष्काळजीपणाने कलम ३५३ऐवजी ‘३५४’ लिहिल्याने नसता मनस्ताप    

एकनाथ खडसे (संग्रहित छायाचित्र)

निवडणूक प्रतिज्ञापत्रात निष्काळजीपणाने कलम ३५३ऐवजी ३५४लिहिल्याने नसता मनस्ताप    

‘ध’ चा ‘मा’ झाल्याने काय होते, हे आपणा सर्वानाच माहीत आहे. पण नजरचुकीने ‘३’ ऐवजी ‘४’ लिहिल्याने किती मन:स्ताप होतो, हे भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे सांगू शकतील..

त्याचे घडले असे, की ‘असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉम्र्स’ (एडीआर) या दिल्लीस्थित प्रतिष्ठित संस्थेने देशातील सर्व आमदार व खासदारांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्वत:वरील गुन्ह्यांच्या दिलेल्या तपशिलांआधारे ५१ जणांविरुद्ध महिला अत्याचारविषयक गुन्हे असल्याची माहिती देणारा अहवाल बुधवारी प्रकाशित केला होता. त्या ५१जणांमध्ये खडसेंसह महाराष्ट्रातील १२ लोकप्रतिनिधींचा समावेश असल्याचे अहवालात नमूद केले होते. तसेच खडसे यांच्यावर भारतीय दंडविधानातील कलम ३५४ नुसार महिलेच्या विनयभंगाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा असल्याचा तपशील त्यात दिला होता. त्याला पुष्टी देणारी माहिती स्वत: खडसे यांनी २०१४मध्ये मुक्ताईनगरमधून (जि. जळगाव) विधानसभा लढविताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिली होती. आपल्याविरुद्ध ‘कलम ३५४’ लावल्याचे नमूद केले होते.

‘‘हे पाहून मला धक्काच बसला..,’’ खडसे सांगत होते, ‘‘आपल्याविरुद्ध महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्नचा गुन्हा असल्याचे मला तरी माहीत नव्हते. जेव्हा मी माहिती घेण्यास सुरुवात केली आणि कागदपत्रे गोळा केली तेव्हा मला खरा प्रकार उलगडला. कापसाला भाव देण्याप्रकरणी २००५मध्ये तत्कालीन मंत्री विमल मुंदडा यांच्याविरुद्ध आम्ही आंदोलन केले होते. त्या प्रकरणी राजकीय व सामाजिक आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दलचे ‘कलम ३५३’अन्वये माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याचा रीतसर उल्लेख मी २०१४च्या प्रतिज्ञापत्रात केला होता. पण तो लिहिताना गडबड झाली आणि ‘कलम ३५३’ऐवजी नजरचुकीने ‘कलम ३५४’ लिहिले गेले. ती चूक झाली ती पोलिसांनी चुकीची माहिती दिल्याने. परिणामी प्रतिज्ञापत्रात ‘कलम ३५४’ राहूनच गेले आणि त्याआधारे ‘एडीआर’च्या अहवालात माझे नाव विनाकारण लिहिले गेले. या घटनेचा मला खूप मन:स्ताप झाला. माझ्याबद्दल विनाकारण गैरसमज पसरला गेला. लिहितानाच्या निष्काळजीपणाची चूक महागात पडली..’’ महत्त्वाचे म्हणजे, २००५मधील त्या खटल्यातून खडसे जानेवारी २०१५मध्येच दोषमुक्त झालेले आहेत!  ‘त्या’ ५१ खासदार व आमदारांमध्ये सर्वाधिक म्हणजे १२ गुन्हे महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींवर आहेत. त्यामध्ये प्रकाश मेहता, राज पुरोहित, सरदार तारासिंह, प्रा. देवयानी फरांदे (सर्व भाजप), खासदार राजकुमार धूत, संजय पोतनीस, सुनील राऊत, गौतम चाबुकस्वार, हर्षवर्धन जाधव (सर्व शिवसेना) आदींचा समावेश आहे. बहुतेक ‘आरोपी’ लोकप्रतिनिधींवर कलम ३५४ व कलम ५०९चे (शाब्दिक व हावभावांद्वारे विनयभंगाचा प्रयत्न) गुन्हे आहेत. मात्र, बहुतेक गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र सादर झालेले नाही.

माझ्यावर कलम ३५४अन्वये गुन्हा असल्याचे भुसावळ न्यायाधीशांच्या आदेशात कोठेही नमूद नाही. तसेच ३५४अन्वये माझ्यावर अन्यत्रही कोठे गुन्हा नाही..   एकनाथ खडसे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 12:38 am

Web Title: eknath khadse explanation about section 354
Next Stories
1 संघ कार्यकर्त्यांच्या खुनाच्या कटाचे माकप नेते पी. जयराजन मुख्य सूत्रधार
2 घटनेतील कलम ३७० व ३५ अ तात्काळ रद्द करण्याची ‘पनून’ची मागणी
3 ‘मुस्लिम असल्यामुळेच मोदी सरकारकडून माझा छळ’
Just Now!
X