नागपुरात ६० टक्के, रामटेक ५५ टक्के; गडकरी, पटोले, तुमाने, गजभिये यांचे भाग्य ईव्हीएमबंद

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात आज रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता मतदारांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. नागपुरात सरासरी ६० टक्के तर रामटेक लोकसभा मदारसंघात ५५ टक्के मतदान झाले. मतदान यंत्रात बिघाड, त्यामुळे मतदान प्रक्रियेला होणारा विलंब यासारखे प्रकार याही निवडणुकीत घडले. मतदार याद्यांमधील घोळाचा फटका हजारो मतदारांना बसला. येत्या २३ मे रोजी मतमोजणी होणार असून तोपर्यंत नागपुरातील ३० व रामटेकमधील १६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद असणार आहे.

भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रिंगणात असल्याने नागपूरच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. देशभरातील माध्यम प्रतिनिधी मतदारांचा कल जाणून घेण्यासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. आज सकाळी ७ वाजतापासून शहरातील २०६७ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. विधानसभेच्या  सहाही मतदारसंघात सर्वच केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. मतदान प्रक्रिया संथ असल्याने सकाळी ९ पर्यंत ९.३३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतर उन वाढू लागल्याने मतदारांचा उत्साह मावळेल अशी शक्यता होती. मात्र, उन्हातही रांगा कमी झाल्या नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून मतदान प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर मतदानाची गती वाढली. स. ११ पर्यंत १७.५६ टक्के, दु. १ पर्यंत २७.४७ टक्के, दु. ५ पर्यंत ५३.१३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतरही मतदान केंद्रावर रांगा कायम होत्या.

मध्य नागपुरातील हलबाबहुल वस्त्या, उत्तर व दक्षिण नागपुरातील दलितबहुल वस्त्या तसेच बहुसंख्य मुस्लीम वस्त्यांचा समावेश असलेल्या मोमीनपुऱ्यातही रणरणत्या उन्हात मतदार मतदानाचा हक्क बजावत असल्याचे चित्र होते. मतदार याद्या अद्ययावत करण्याबाबत पुरेसे प्रयत्न करूनही अनेकांना यादीत नाव नसल्याने मतदान करता आले नाही. ईव्हीएममध्ये बिघाड होण्याच्या १७ तर , व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड होण्याच्या ६ तक्रारी दुपापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या. तेथे नवीन यंत्र उपलब्ध करून देण्यात आले, असे जिल्हाधिकारी अश्वीन मुद्गल यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले.

दरम्यान, मतदान प्रक्रिया

थांबल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी मतदानच केले नाही.

असे झाले मतदान (टक्के)

  • स. ११ पर्यंत -१७.५६
  • दु. १ पर्यंत -२७.४७
  • दु. ५ पर्यंत -५३.१३
  • सायं.५ पर्यंत -६०

१ वाजेपर्यंत

  • पुरुष- ३,२०,६०७ (२९.२४ टक्के)
  • महिला- २,७२,८३७(२५.६५ टक्के)
  • इतर- २ (२.६०टक्के)
  • झालेले मतदान- ५,९३,४४६ (२७.४७ टक्के)

३ वाजेपर्यंत

  • पुरुष- ४,३३,९४२ (३९.५८ टक्के)
  • महिला- ३,५९,३३४ (३३.७८ टक्के)
  • इतर- ३ (३.९० टक्के)
  • झालेले मतदान- ७,९३,२७९ (३६.७२ टक्के)

नागपूर लोकसभा

  • २०१४ – ५७.०८
  • २०१९ – ६० टक्के