लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत पुणे जिल्ह्यतील पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चार लोकसभा मतदार संघांच्या कार्यक्षेत्रातून ८८ लाख रुपयांची रोकड भरारी पथकांनी जप्त केली आहे. सर्वाधिक रोख रक्कम शिरूर लोकसभा मतदार संघातून ताब्यात घेण्यात आली आहे. तर, आतापर्यंत आचारसंहिता भंगाचे २१३ गुन्हे दाखल झाले आहेत.

निवडणूक आचारसंहितेचे योग्यरीतीने पालन होत आहे किंवा कसे याची माहिती घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भरारी पथके नेमली आहेत. तसेच सी-व्हिजिल अ‍ॅपवर आलेल्या तक्रारींनुसार कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत २१३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये बेकायदा मद्य बाळगल्याचे गुन्हे सर्वाधिक आहेत. विनापरवाना सभा घेतल्याचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

निवडणुकीच्या काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. कोणताही गैरप्रकार आढळल्यास नागरिकांना दोन मिनिटांची चित्रफीत आणि छायाचित्र अपलोड करण्याची सुविधा या अ‍ॅपवर आहे. या अ‍ॅपवरून माहिती कळवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अ‍ॅपवर माहिती देणाऱ्याचे नाव आणि मोबाइल क्रमांक गुप्त राहतो. तक्रार कोणी केली आहे, हे भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही समजू शकत नाही.

नागरिकाने तक्रार नोंदविल्यानंतर पाच मिनिटांमध्ये ती तक्रार जिल्हा नियंत्रण कक्षाकडे दाखल होते. तेथून ती माहिती भरारी पथकाकडे पाठवण्यात येते. संबंधित पथक १५ मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचते. तक्रारीनंतर ३० मिनिटांत कारवाई करण्यात येणार आहे. तक्रार अपलोड झाल्यापासून १०० मिनिटांमध्ये तक्रारीची स्थिती तक्रार करणाऱ्या नागरिकाला समजणार असून, त्याबाबत मोबाइल क्रमांकावर संदेश पाठवला जाणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, परवाना घेऊ न शस्त्रे बाळगणाऱ्या पाच हजार १३८ जणांना शस्त्र जमा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासन, पुणे शहर पोलीस आणि ग्रामीण पोलिसांनी दिले आहेत. त्यापैकी पाच हजार ३५ जणांनी शस्त्रे जमा केली आहेत. उर्वरित १०३ जणांनी शस्त्रे अद्यापही जमा केली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शिरूर मतदार संघातून ४९ लाख रुपये जप्त

आचारसंहितेच्या काळात भरारी पथकांनी काही जणांकडून रोख रक्कम जप्त केली आहे. त्यामध्ये शिरूर लोकसभा मतदार संघातून सर्वाधिक ४९ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. पुण्यातून २१ लाख रुपये, बारामती मतदार संघातून १६ लाख ७८ हजार रुपये आणि मावळमधून एक लाख ३५ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. मावळ लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तीन मतदार संघ पुणे जिल्ह्य़ाच्या अखत्यारित आहेत. अन्य तीन मतदार संघ हे कोकणातील आहेत. तेथील गुन्ह्य़ांचा या माहितीत समावेश नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.