राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी (आरएसएस) प्रत्येक भारतीय हा हिंदूच आहे, अशी भुमिका संघप्रमुख मोहन भागवत यांनी मंगळवारी परदेशी पत्रकरांसमोर मांडली. यावेळी त्यांनी देशातील विविध मुद्द्यांवरील संघाची भुमिकाही स्पष्ट केली.

भागवत म्हणाले, “हिंदूत्ववाद म्हणजेच विविधतेत एकता आणि हीच संघाची हिंदुत्वाची व्याख्या आहे, त्यामुळेच प्रत्येक भारतीय हा संघासाठी हिंदूच आहे.” यावेळी संघाचे सरचिटणीस सुरेश भय्याजी जोशी यांनी देखील परदेशी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. जात आधारीत आरक्षण, समलैंगिकता आणि सध्या आसाममध्ये सुरु असलेला एनआरसीचा मुद्दा यावरील विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. ते म्हणाले, लोकांना हद्दपार करण्यासाठी नव्हे तर जे लोक भारतीय नागरिक नाहीत त्यांची ओळख पटवण्यासाठी एनआरसी आणण्यात आले आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

यावेळी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला आरएसएसचा पाठींबा असल्याचे भागवत यांनी सांगितले. या विधेयकामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील जे हिंदू आहेत त्यांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्याचा प्रस्ताव आहे. भारताशिवाय या हिंदूंना जगात इतरत्र कुठेही जागा नाही, त्यामुळे या विधेयकाला पाठींबा असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, “काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यामुळे आता आपले काम किंवा जमीन हातून जाईल याची भीती स्थानिक तरुणांनी बाळगू नये, असेही भागवत यावेळी म्हणाले. हे कलम रद्द झाल्यामुळे काश्मीरला भारतासोबत सामावून घेण्यासाठीचे सर्व अडथळे आता दूर झाले आहेत, ही संघाची खूप जुनी मागणी होती. तसेच जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन करण्याच्या सरकारच्या निर्णयालाही संघाचा पाठींबा आहे,” असे भागवत यांनी सांगितले.

दरम्यान, गाईच्या नावाने होत असलेल्या मॉब लिचिंगच्या घटनांचा यावेळी भागवत यांनी निषेध केला. संघ सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा निषेध करतो. जर यामध्ये कोणताही संघ स्वयंसेवक दोषी आढळला तर कायद्यानुसार त्याला शिक्षा होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.