तुम्ही फेसबुक ही सोशल नेटवर्किंग साईट वापरत असाल तर सावधान! कारण एक दोन नाही तर सुमारे ६० कोटी युजर्सचे पासवर्ड हे फेसबुकमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला पहाता येतात अशी धक्कादायक कबुली फेसबुकने दिली आहे. फेसबुक कंपनीबाहेर हे पासवर्ड कुणालाही समजलेले नाहीत. तसेच याचा दुरुपयोग करण्यात आलेला नाही असं स्पष्टीकरणही फेसबुकतर्फे देण्यात आलं आहे.

सायबर सुरक्षा तपासणीच्या वेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फेसबुकने युजरसोबत केलेल्या सुरक्षा करारांचा हा भंग आहे असाही आरोप होतो आहे. एका ब्लॉग पोस्टद्वारे इंजिनिअरींग, सिक्युरिटी अँड प्रायव्हसी व्ही पी पेड्रो कनाहौती यांनी याबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान जानेवारी महिन्यात हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. फेसबुकचे सॉफ्टवेअर इंजिनिअर स्कूट रेन्फ्रो यांनीही एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. तसेच एकाही पासवर्डचा दुरुपयोग करण्यात आलेला नाही असंही फेसबुकने स्पष्ट केलं आहे.