चारा घोटाळ्याप्रकरणी झारखंड हायकोर्टाने शुक्रवारी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना दिलासा देण्यास नकार दिला. हायकोर्टाने लालूप्रसाद यांना जामीनाचा कालावधी वाढवून देण्यास नकार दिला आहे. ३० ऑगस्टपर्यंत पोलिसांसमोर हजर व्हावे, असे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.

चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ११ मे रोजी हायकोर्टाने लालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर केला होता. २९ जून रोजी त्यांच्या जामिनाची मुदत तीन आठवड्यांसाठी वाढवण्यात आली. या कालावधीत यादव यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव त्यांना १७ ऑगस्टपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, त्या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे सुनावणी झाली नाही.

अखेर शुक्रवारी हायकोर्टात न्या. अपरेश कुमार सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यादव यांच्या वतीने ह्रदयविकार, मधूमेह आणि अन्य कारणास्तव जामिनाची मुदत वाढवावी, अशी विनंती करण्यात आली. लालूप्रसाद यांच्या वकिलांनी तीन महिन्यांनी मुदत वाढवून द्यावी, असे हायकोर्टात सांगितले. हायकोर्टाने लालूप्रसाद यांच्या वकिलांची मागणी फेटाळून लावली. कोर्टाने लालूप्रसाद यांना ३० ऑगस्टपर्यंत पोलिसांसमोर शरण जाण्याचे आदेश दिले. या कालावधीत लालूप्रसाद यादव यांनी कोणत्याही राजकीय सभा किंवा कार्यक्रमात सहभागी होऊ नये, असे हायकोर्टाने स्पष्ट केले.