धार्मिक पर्यटनाला चालना आणि त्यातून नफा मिळवण्याच्या दुहेरी उद्देशाने भारतीय रेल्वेने बौद्ध तीर्थस्थळांचे दर्शन घडवणारी विशेष डिलक्स ट्रेन शनिवारपासून सुरु केली आहे. भगवान गौतम बुद्धांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व महत्वाच्या स्थळांवर बौद्ध सर्किट टुरिस्ट ट्रेनला थांबा देण्यात आला आहे. बोधगया, राजगीर (नालंदा), वाराणसी (सारनाथ), लुमबिनी, कुशीनगर, श्रावस्ती असा प्रवास करुन ही ट्रेन आग्र्याला जाईल. पर्यटकांना ताज महाल पाहता यावा यासाठी आग्रा हे डीलक्स ट्रेनचे शेवटचे स्थानक असेल.

श्री रामायण एक्सप्रेस सुरु केल्यानंतर काही महिन्यांनी रेल्वेने ही ट्रेन सुरु केली आहे. रामायण एक्सप्रेसमुळे पर्यटकांना भगवान प्रभूरामचंद्रांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या तीर्थस्थळांचे दर्शन घेता येते. हे एकूण १६ दिवसांचे पॅकेज असते. दिल्लीहून ही ट्रेन निघाल्यानंतर सर्वप्रथम अयोध्येला थांबते. त्यानंतर हनुमान गढही रामकोट, कनक भवन, नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग, चित्रकूट, नाशिक, हम्पी आणि रामेश्वरम या ठिकाणी ही ट्रेन थांबा घेते.

जपान, चीन, थायलंड आणि श्रीलंकेतून पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेने ही विशेष ट्रेन सुरु केली आहे. बौद्ध सर्किट टुरिस्ट ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोयी-सुविधांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. या ट्रेनधून प्रवास अत्यंत आरामदायी असेल. चार डब्बे फर्स्ट टायर एसी, दोन सेकंड टायर एसी, एक किचन कार, दोन डायनिंग कार, एक स्टाफ कार आणि दोन पावर कार आहेत. फर्स्ट एसी डब्ब्यातील प्रवाशांना लॉकर आणि शॉवरची विशेष सुविधा आहे.

बौद्ध तीर्थस्थळांचे दर्शन घडवणाऱ्या विशेष डीलक्स ट्रेनचे तिकिट ६७ हजार रुपये आहे. परदेशी पर्यटकांना डोळयासमोर ठेऊन ही ट्रेन सुरु करण्यात आली आहे. बौद्ध सर्किट टुरिस्ट ट्रेनच्या तुलनेत रामायण एक्सप्रेसचे तिकिट खूपच स्वस्त आहे. रामायण एक्सप्रेसचे तिकिट फक्त १५,१२० रुपये आहे. यामध्ये राहण्याची आणि जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे.