जीन्स आणि लिपस्टिकमुळे निर्भयासारख्या बलात्काराच्या घटनांना चालना मिळते असे अजब ‘धडे’ एका शिक्षिकेने विद्यार्थिनींना दिले आहे. रायपूरमधील केंद्रीय विद्यालयातील जीवशास्त्र विषयाच्या शिक्षिकेने मुलींना कपड्यांवरुन उपदेशाचे डोस दिले आहेत. या प्रकारावरुन विद्यार्थिनींमध्ये नाराजी पसरली आहे.

रायपूरमधील केंद्रीय विद्यालयात स्नेहलता शंखवार या जीवशास्त्र विषय शिकवतात. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार शंखवार यांनी वर्गात मुलांसमोरच मुलींचे कपड्यांवरुन ‘समुपदेशन’ केले. मुलींनी जीन्स घालू नये आणि लिपस्टिक लावू नये असा सल्ला देताना त्या म्हणाल्या, जेव्हा मुलींचा चेहरा देखणा नसतो तेव्हा त्या शरीरप्रदर्शन करतात. मुली निर्लज्ज झाल्या आहेत. लग्न झालेले नसतानाही निर्भयाला एका तरुणासोबत रात्री उशिरा घराबाहेर पडण्याची गरजच काय होती? ग्रामीण भागात अशा घटना होत राहतात. निर्भयाच्या आईने तिला रात्री घराबाहेर सोडायला नको हवे होते, असे त्या शिक्षिकेने वर्गात सांगितले. मुलगी जेव्हा असे कपडे घालते तेव्हा तिला चारित्र्य चांगले नाही असे मुलांना वाटते. निर्भयाा प्रकरणात मुलाची नव्हे तर मुलीचीच चुक होती, असे शंखवार यांनी म्हटले होते. एखादी मुलगी जर दुसऱ्यासोबत असे काही करु शकते तर तिने तेच सूख मला देखील दिले पाहिजे, अशी भावना मुलांच्या मनात येते, असे शंखवार यांनी म्हटल्याचा आरोप आहे.

शाळेतील नववी आणि दहावीच्या विद्यार्थिनींनी स्नेहलता शंखवार यांचे म्हणणे मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. पुरावा म्हणून त्यांनी पालकांना ही क्लिप ऐकवली. शेवटी पालकांनी शाळेत येऊन मुख्याध्यापकांकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली. आमच्या मुलींना शाळेत येताना देखील लाज वाटते. शिक्षिकेवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी या प्रकरणात २४ जानेवारी रोजी निनावी पत्राद्वारे तक्रार करण्यात आली होती, असे मान्य केले. मात्र, शिक्षिकेविरोधात राग असावा आणि म्हणून एखाद्या मुलीने हे पत्र पाठवले असेल, असे वाटत होते. आता ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर शिक्षिकेवर कारवाई होणारच, असे आश्वासन त्यांनी दिले.