राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर संसदेत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपले म्हणणे मांडतांना छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडला पुन्हा राजधानीचा दर्जा द्या, अशी मागणी केली.

यावेळी खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, १७ व्या शतकात जसे रायगड राजधानी होती, तशीच ती पूर्ववत करावी. स्टॅच्यू ऑफ युनिटीप्रमाणे ती जपायला हवी असे त्यांनी म्हटले.  तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी १७ व्या शतकात किल्ले रायगडाची उभारणी केली. त्यासह अनेक किल्लेही महाराजांनी बांधले. महाराजांनी या वास्तू ना स्वत:च्या नावे केल्या, ना कुटुंबातील व्यक्तींच्या. शिवाजी महाराजांनी हे किल्ले रयतेची संपत्ती म्हणून जपले. त्यामुळे या किल्ल्यांची पुन्हा नव्याने उभारणी व्हावी, अशी मागणी देखील खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत केली.

पाहा व्हिडीओ

छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी  अमोल कोल्हे हे नेहमीच आग्रही असतात. त्यांनी टीव्ही मालिका व सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेने तर अमोल कोल्हे यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवले आहे. लोकसभा निवडणुकीत शिरुर लोकसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजयी झालेल्या अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला आहे.