माजी सैनिकांच्या एक श्रेणी-एक निवृत्तिवेतन या मागणीवर गेल्या ४० वर्षांतील सरकारांनी केवळ खेळ केला, राजकारण केले, पण आपण हा जटिल प्रश्न सोडवू, फक्त त्यासाठी थोडा वेळ द्यावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात सांगितले.
माजी सैनिकांच्या मागणीवर मागील ४० वर्षांत केवळ राजकारण करण्यात आले असे सांगून ते म्हणाले की, हा प्रश्न सोडवण्यासाठी मार्ग काढताना तो सर्वाना स्वीकारार्ह व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ४० वर्षे तुम्ही सहनशीलता दाखवलीत, आता आपल्याला थोडा वेळ द्या, असे आवाहन त्यांनी माजी सैनिकांना केले. एक श्रेणी-एक निवृत्तिवेतनाच्या मागणीसाठी अलीकडेच आंदोलन करण्यात आले होते. आमचे सरकार आल्यानंतर विविध विभागांनी या मागणीवर विचार सुरू केला आहे. त्यावर लवकरच मार्ग काढला जाईल. हा प्रश्न सोपा आहे असे आपल्याला वाटले होते, पण तो जटिल आहे, कारण गेल्या अनेक वर्षांत तो अधिक कठीण झाला. काही लोक यावर राजकारण करीत आहेत, पण आपण झटपट निर्णय घेऊन हा प्रश्न गुंतागुंतीचा करू इच्छित नाही, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
२५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी सरकारच्या वर्षपूर्तीबाबत सांगितले. सरकारच्या कामगिरीचे विश्लेषण झाले, काहींनी टीका केली, काहींनी आम्हाला चांगले गुण दिले. लोकशाहीत अशी साधकबाधक चर्चा आवश्यक आहे, काय उणिवा आहेत हे त्यातून समजते. चांगल्या गोष्टींचे फायदे असतातच, असे ते म्हणाले.
सरकार गरिबांच्या विरोधात आहे, हा आरोप खोडून काढताना त्यांनी सांगितले की, आपल्याला गरिबांची जाणीव आहे. त्यांच्यासाठी तीन सामाजिक सुरक्षा योजना लागू केल्या आहेत, त्यात पंतप्रधान विमा योजना, अटल पेन्शन योजना यांचा समावेश आहे. या योजना २० दिवसांत लोकप्रिय झाल्या, ८.५२ कोटी लोकांनी त्यात सहभाग घेतला आहे. गरिबांचे सक्षमीकरण करण्याचा आपला हेतू आहे. त्यांना कुणापुढे हात पसरावे लागू नयेत असेच आपल्याला वाटते.