पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर किती दहशतवाद्यांनी हल्ला केला यावरुन केंद्र सरकारमध्येच संभ्रम असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सहा दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचा दावा केला असला तरी मंगळवारी लोकसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहिर यांनी चार दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती दिली आहे.

लोकसभेत काँग्रेस खासदार रवनीत सिंग यांनी पठाणकोट हल्ल्याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर मंगळवारी गृहराज्य मंत्री हंसराज आहिर यांनी उत्तर दिले. पाकिस्तानमधील चार दहशतवादी पंजाबमधील रावी नदीवरुन पुलाच्या मार्गे पठाणकोटमध्ये दाखल झाले अशी माहिती आहिर यांनी लोकसभेत दिली आहे.  विशेष म्हणजे गृहमंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पठाणकोटमध्ये सहा दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती दिली होती. संसदेतही त्यांनी अशाच स्वरुपाची माहिती दिली. मात्र इंडियन एक्सप्रेसला एनआयएमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पठाणकोटमध्ये चार दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले होते. घटनास्थळी चारच एके ४७ होत्या. त्यामुळे आणखी दहशतवादी असण्याची शक्यता नव्हती अशी माहिती इंडियन एक्सप्रेसने यापूर्वीच दिली होती.

राष्ट्रीय सुरक्षा पथकातील (एनएसजी) जवानांना हवाई तळावरील एका ठिकाणी आणखी दोन दहशतवादी लपले असाव अशी शंका होती. त्यामुळे दोन दिवस या ठिकाणी गोळीबार करण्यात आला होता. यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनीदेखील सहा दहशतवाद्यांनीच हल्ला केल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे सहा दहशतवादी असल्याचा दावा केला गेला असला तरी एनआयएला दोन दहशतवाद्याचे मृतदेह किंवा शस्त्रास्त्र सापडली नव्हती. गुप्तचर यंत्रणांनाही फोनवरील संभाषणावरुन चार दहशतवादीच असल्याचे आढळले होते.  आता लोकसभेत सरकारकडूनच दहशतवाद्यांच्या संख्येबाबत वेगवेगळी माहिती दिल्याने गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय अडचणीत सापडले आहे.