करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक देशात वाढतच आहे. ३० ते ३५ हजारांनी वाढणारी रुग्णसंख्या आता ५० हजारांच्या घरात गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत तब्बल ४९ हजार ३१० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी करोनाबादित रुग्णांची वाढ आहे. गुरुवारी देशात ७४० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण ३०,६०२ करोनाबळी झाले आहेत.

देशातील करोना रुग्णवाढीचा हा नवा उच्चांक नोंदविण्यात आला. देशातील एकूण रुग्णसंख्या १२,८७,९४५ वर पोहोचली आहे. देशभरात करोनामुक्त झालेल्यांची संख्याही वाढली असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६३.१८ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात आतापर्यंत ८,१७,२०९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या ४,४०,१३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. म्हणजेच करोनामुक्त रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा अधिक आहे.

गेल्या तीन दिवसांत दहा लाख चाचण्या करण्यात आल्या. त्यातील गेल्या २४ तासांत सुमारे साडेतीन लाख चाचण्या करण्यात आल्या. आता चाचण्यांची क्षमता वाढविण्यात आली असून, रोज जवळपास चार लाख चाचण्या करण्यात येणार असल्याचे ‘आयसीएमआर’चे माध्यम समन्वयक लोकेश शर्मा यांनी सांगितले. करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्यांशी समन्वय साधून केंद्र सरकार अनेक पावले उचलत आहे. करोनाचा मोठय़ा प्रमाणावर फैलाव होत असलेल्या भागांत केंद्राकडून तज्ज्ञांची पथके पाठविण्यात येत आहेत.

राज्यात ९८९५ नवे बाधित

राज्यात गेल्या २४ तासात ९८९५ नवे करोनाचे रुग्ण आढळले. याच काळात २९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. पुण्यातील रुग्ण संख्या अद्यापही कमी झालेली नाही. महाराष्ट्रात करोनामुळे आतापर्यंत १२,८५४ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात पुणे (१८००), पिंपरी-चिंचवड (९५०), मुंबई (१२४५), कल्याण-डोंबिवली (४१४), ठाणे (३५१), मीरा-भाईंदर (२९३), वसई-विरार (३०२), नाशिक (३८३) रुग्ण आढळले. उपचाराधीन रुग्णांमध्ये पुणे जिल्हा (४१,३५७), ठाणे जिल्हा (३६८५७), मुंबई (२२९५८), नाशिक (४७४९), औरंगाबाद (४६९२) रुग्ण आहेत.