अयोध्येत राममंदिर बांधण्याची तयारी सुरू असतानाच आता एका मुस्लीम गटाने बाबरी मशीद बांधण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, नुकतीच बाबरी मशिदीची थर्मोकोलची प्रतिकृती एका मुस्लीम गटाने सादर केली आहे. अयोध्येतील काझियान वसाहतीत बाबरी मशिदीची ही प्रतिकृती सादर करण्यात आली आहे. बाबरी मशिदीच्या वादग्रस्त वास्तूच्या ठिकाणापासून ही वसाहत जवळच आहे.
स्थानिक प्रशासनाने सांगितले, की या सगळय़ा घडामोडीनंतर जलद कारवाई केली जात आहे. काही स्थानिक मुस्लीम नेत्यांना विश्वासात घेऊन ही प्रतिकृती काढून टाकण्यास सांगण्यात आले. सरकारने राममंदिरासाठी येत असलेल्या शिळांची वाहतूक थांबवलेली नाही, त्यामुळे आम्ही ही प्रतिकृती मागे घेणार नाही, अशी भूमिका मुस्लीम गटाने घेतली आहे. त्यानंतर त्यांनी रामजन्मभूमी पोलीस स्टेशनबाहेर निदर्शने केली. फैजाबादचे जिल्हा दंडाधिकारी आर. एन. शर्मा यांनी सांगितले, की प्रशासन शांतताभंग करणाऱ्या कुठल्याही कारवाया चालू देणार नाही. पोलीस अधीक्षक आर. ए. गौतम यांनी सांगितले, की अयोध्येतील परिस्थिती सुरळीत आहे. राममंदिर उभारणीसाठी येथे दोन ट्रक भरून शिळा ट्रकने आणण्यात आल्या आहेत तेव्हापासून अयोध्या पुन्हा चच्रेत आहे. राममंदिराच्या दगडांचे कोरीव कामही सुरू झाले.