चिनी नौदलाच्या ६५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत भारत, चीन आणि पाकिस्तान या तीनही देशांच्या नौदलांनी एकत्रित सामरिक कसरती केल्या. भारताविरोधीतील चीन आणि पाकिस्तानची ‘आघाडी’ लक्षात घेता हा अत्यंत दुर्मीळ योग मानला जात आहे. प्रत्यक्ष युद्धसराव, नाविक हालचाली आणि दहशतवाद्यांविरोधातील वेगवान मोहिमा आदींचा सराव या कसरतींदरम्यान करण्यात आला.
भारतातर्फे आयएनएस शिवालिक या युद्धनौकेने या कसरतींमध्ये सहभाग घेतला होता. या युद्धनौकेबरोबरच, १८ जहाजे, सात हेलिकॉप्टर्स आणि नौदलातील अधिकारीही यात सहभागी झाले होते. भारत, चीन आणि पाकिस्तान या तीन देशांव्यतिरिक्त बांगलादेश, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया आमि ब्रुनेई या देशांच्या नौदलांनीही या कसरतींमध्ये भाग घेतला होता.
चीनतर्फे अशा प्रकारच्या ‘बहुदेशीय नौदल कसरतींचे’ प्रथमच आयोजन करण्यात आले होते. ‘मेरिटाइम कोऑपरेशन २०१४’ या सांकेतिक नावाने पार पडलेल्या या कसरतींमध्ये संयुक्त शोध मोहिमा, ‘टास्क फोर्स’मधील दळणवळण, अपहरणविरोधी संयुक्त मोहिमा आणि कमी क्षमतेच्या स्फोटांचा प्रभावी वापर आदी बाबींचा समावेश होता. या कसरतींचे नेतृत्व चिनी बनावटीच्या ‘हर्बिन’ या विनाशिकेकडे होते.
दरम्यान, आयएनएस शिवालिकची चीनमध्ये जाण्याची ही दुसरी वेळ. या वेळी ही युद्धनौका येथील जनसामान्यांसाठी खुली करण्यात आली होती. या वेळी ४०० चिनी नौसैनिकांसह १५०० जणांनी या युद्धनौकेची पाहणी केली.