पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) पूर्व लडाखमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याच्या जवळजवळ ४ महिन्यांनंतर, २९-३० ऑगस्टच्या रात्री भारताने पहिल्यांदाच आपल्या डावपेचात्मक हालचालींनी चीनवर मात केली.
पहाट उजाडेपर्यंत भारतीय फौजांनी पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याकडून शिरकाव करत प्रत्यक्ष ताबारेषेवरील काही महत्त्वाची अशी उंच ठिकाणे ताब्यात घेतली. या हालचालीमुळे, प्रत्यक्ष ताबारेषेवरील चिनी हद्दीतील ठाण्यांना धोका निर्माण झाला आणि या सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर भारताला जी माघार घ्यावी लागली होती, तिची भरपाई झाली.
यापूर्वी कुणीही न पोहोचलेल्या ठिकाणांकडे पीएलएच्या फौजा वाटचाल करत असल्याचे आपल्या नजरेला पडले असल्याने, चीनच्या या कृतीचा आपल्याला आधीच अंदाज आला होता, असे भारतीय लष्कराने सांगितले.
मात्र, उंच ठिकाणावर पोहोचण्याच्या या मोहिमेसाठी एक महिन्याचे काळजीपूर्वक नियोजन करावे लागले. फौजा माघारी घेण्याबाबत चीन गंभीर नसल्याची जाणीव झालेली असल्याने अशा प्रकारची कृती करण्याच्या योजनेसाठी दिल्लीहून राजकीय स्तरावर हिरवा कंदील मिळाला होता, असे सुरक्षा दलांतील सूत्रांनी सांगितले.